महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीत बॅक फूटवर? ठाकरेंची ससेहोलपट होणार; सत्ताधाऱ्यांचा दावा - Uddhav Thackeray - UDDHAV THACKERAY

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांकडून उद्धव ठाकरेंना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये आणि त्यांना जागा वाटपातही नमतं घ्यावं लागू शकतं, असा दावा सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2024, 4:07 PM IST

मुंबईUddhav Thackeray-लोकसभा निवडणुकीत आघाडीवर असलेले आणि प्रचारामध्ये नेतृत्व करत राज्यभर दौरा करणारे उद्धव ठाकरे यंदा मात्र अद्यापही प्रत्यक्षात मैदानात उतरलेले दिसत नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या विधानसभा निवडणुकीत बॅक फूटवर जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांकडून उद्धव ठाकरेंना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये आणि त्यांना जागा वाटपातही नमतं घ्यावं लागू शकतं, असा दावा सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. दुसरीकडे आमचे काम व्यवस्थित सुरू असून, आम्ही निश्चित आघाडी घेऊ, असं प्रत्युत्तर शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी संजय शिरसाटांना दिले आहे.

25 सप्टेंबर 2023 ला मुंबई शिवसेना पक्षातल्या फुटीनंतर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे दोघेही महाराष्ट्रात पूर्ण ताकदीनं स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. शिवसेना पक्षातून 40 आमदार घेऊन बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मूळ शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चमत्कार केला. महाविकास आघाडीचे नेतृत्व करत त्यांनी राज्यभरात केलेल्या प्रचार दौऱ्यामुळे महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. प्रत्यक्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या तरी त्यांच्या सहकारी पक्षांना मात्र चांगलाच फायदा झाला आहे. खरं तर उद्धव ठाकरेंमुळेच सहकारी पक्षांची ताकद आपोआप वाढली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नऊ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आठ जागा, तर काँग्रेसला 13 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे पारडे जड झालेय आणि विधानसभा निवडणुकीतही हे चित्र दिसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या काही कंपन्यांनी तसेच सर्व्हेसुद्धा जाहीर केलेत. मात्र राज्य सरकारने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अन्य काही योजनांमुळे वातावरण काहीसे बदलले आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोग राज्यातील निवडणुका कधीही घोषित करू शकतात. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अशी परिस्थितीतही अद्याप प्रत्यक्ष प्रचाराच्या रिंगणात उतरलेले दिसत नाहीत.

सहकारी पक्षांमुळे उबाठाची कोंडी :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, अशी आग्रही मागणी सहकारी पक्षांकडे केली होती. मात्र या दोन्ही पक्षांनी यासंदर्भात फारसा प्रतिसाद दिला नाही. काँग्रेसने तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याबाबत काहीही ठरवले नाही, असे सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही यासंदर्भात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक प्रकारे कोंडी झाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंना प्रचार करता येत नाही. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेतृत्व केले तर मतांच्या गोळाबेरीजावर फरक पडेल, अशी राजकीय वर्तुळातून शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी एक प्रकारे राजकीय कोंडी केली असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची होणार ससेहोलपट :शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सांगितले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आता महाविकास आघाडीतला छोटा भाऊ म्हणजेच छोटा पक्ष झाला आहे. त्यामुळे त्या पक्षाचा तिथे काहीही दबदबा राहिलेला नाही. जागा वाटपामध्येसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कमीत कमी जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाची आता ससेहोलपट होत आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बॅक फूटवर गेला असून, आगामी निवडणुकांमध्ये त्यांना कमी जागा मिळणार आहेत. त्यामुळेच ते विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात दिसत नाहीत, असेही शिरसाट यांनी सांगितले.

नवरात्रीत आम्ही सभांना सुरुवात करणार : दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. काही महत्त्वाचे नेते आमच्या पक्षात दाखल होत आहेत. मातोश्रीवर दररोज 10 मतदारसंघांचा आढावा घेऊन जागा निश्चिती केली जात आहे. सर्व मतदारसंघांचा आढावा संपल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष मैदानात उतरताना तुम्हाला दिसू. आम्ही सध्या चर्चेमध्ये व्यस्त आहोत. मात्र, आमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कामात गुंतलेले आहेत. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही. नवरात्रीत आम्ही सभांना सुरुवात करणार आहोत. आमची कुठेही ससेहोलपट होत नाही. सहकारी पक्षांची भूमिका आणि सहकार्य योग्यरीत्या मिळते आहे. त्यामुळे आम्ही आघाडीवर राहू, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा-

  1. अमित शाहांबरोबर बैठक जागा वाटपाची की 'दादां'च्या मनाधरणीची ? शेवटी ठरलेले उत्तर देत नेते परतले - Amit Shah Maharashtra Visit
  2. भाजपाचा विदर्भावर 'फोकस'; लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळं पीएम मोदी, शाहांचे दौरे वाढले - Assembly Elections 2024

ABOUT THE AUTHOR

...view details