मुंबई Sharad Pawar On CM Post :महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुती असो की महाविकास आघाडी, जागावाटपापासून ते मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यापर्यंत अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीत निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत उघड वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. उद्धव ठाकरेंनी किमान चार भिंतींच्या आत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा, असं विधान केलं. यानंतर आता शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावरून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा : 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री, अमित शाह यांच्यात झालेल्या बैठकीची चर्चा वारंवार उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जाते. भाजपानं मुख्यमंत्री पदासाठी दिलेलं आश्वासन पाळलं नाही, असा आरोप ते सातत्यानं करत आहेत. अशातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी चार भिंतीत, तरी चेहरा ठरवा, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री पदासाठी ज्या नावाची घोषणा करतील, त्याला आपण पूर्ण पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं होतं. यामागचं उद्धव ठाकरेंनी केलेलं राजकारण वेगळं असू शकतं. कारण उद्धव ठाकरेंना माहिती आहे की, आता काँग्रेसकडं मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही. त्याचसोबत हा निर्णय दिल्लीतून सोनिया गांधी, राहुल गांधी घेतील. अशात त्यांनी मागं दिल्लीत या दोघांचीही भेट घेतली. दुसरीकडं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडंसुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही. शरद पवारांनी आतापर्यंत अजित पवार, छगन भुजबळ यासारख्या नेत्यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंतच राहू दिलं. जयंत पाटीलसुद्धा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होऊ शकत नाही. यामागं शरद पवारांचं वेगळं राजकारण असू शकतं. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडं मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय उरत नाही. किंबहुना शिवसेना (उबाठा) नेते, खासदार, संजय राऊत यांनी यापूर्वीच मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याची घोषणा केली आहे.
शरद पवारांचं मोठं विधान : महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांनी आता एक मोठं विधान केलय. आम्हाला राज्यात सरकार बदलायचं आहे. हे करत असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि शिवसेना (उबाठा) यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांचं विधान अशाप्रसंगी आलंय, ज्यावेळी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. एकीकडं उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा असं सांगितलं होतं. असं असताना शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्याचं सांगून मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली आहे.
पवारांची राजकीय खेळी :महाविकास आघाडीत सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले, "2014 ते 2019 विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा पहिल्या क्रमांकावर होता. तरी, 2014 मध्ये 64 तसंच 2019 मध्ये 57 जागांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर अधिक जागा मिळवलेला पक्षा होता. 2014 मध्ये शिवसेनेची भाजपासोबत युती होती. तर 2019 मध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्यानं त्यांची युती तुटली. परंतु आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मतांचा फायदा काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात झाला आहे. काँग्रेसचा 1 खासदार असताना त्यांची मजल 13 खासदारापर्यंत गेली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 10 पैकी 8 जागांवर विजय संपादन केला. हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळं शक्य झालय. हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलाही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व मोठं आहे. त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. दुसरीकडं उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद दिलं, तरी त्यांच्यासाठी ते पुरेस असू शकतं. पुढील अडीच वर्ष शरद पवार यांच्या कन्या, खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान, होऊ शकतात. शरद पवारांची ही महत्वकांक्षा लपून राहिलेली नाही. म्हणूनच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात आठवड्यातून फक्त दोनदा मंत्रालयात येणं, शरद पवारांना आवडलं नव्हत. तरीसुद्धा आत्ताची राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली असल्याकारणानं शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा पुढं करून राजकीय खेळी खेळली आहे".
'हे' वाचलंत का :
- शरद पवारांना केंद्राची Z+ सुरक्षा; नेमके कारण काय? - Sharad Pawar Z Plus Security
- पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन; आमदार रोहित पवार रात्रभर मुलांसोबत, शरद पवार आंदोलनात सहभागी होणार - MPSC Students Protest Pune
- महाराष्ट्रात जनतेला राजकीय परिवर्तन हवंय - शरद पवार - Sharad Pawar on assembly elections