नवी दिल्ली -शिवसेना (यूबीटी) च्या आठ खासदारांनी शुक्रवारी पक्षाशी ठामपणे एकनिष्ठ असल्याचं प्रतिपादन केलं. खा. अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषदेत हे स्पष्ट करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षातून मोठ्या प्रमाणात पक्षत्याग करुन नेते त्यांच्याकडे यत असल्याचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दावा फेटाळून लावला.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दावा केला होता की, अनेक विद्यमान आणि माजी आमदार आणि शिवसेनेचे (यूबीटी) सहा खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्यासाठी तयार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे (यूबीटी) लोकसभेत नऊ आणि राज्यसभेत दोन सदस्य आहेत.
शुक्रवारी (आज), शिवसेनेचे (यूबीटी) लोकसभा सदस्य - अरविंद सावंत, अनिल देसाई, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, संजय जाधव, नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख यांनी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं प्रतिपादन करण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.