मुंबई Mumbai Accident : मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातून भरधाव वेगानं जात असलेल्या कारच्या धडकेमध्ये दहावीतील दोन शाळकरी मुली गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडलीय. या दोघींवर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात भारतीय दंड विधान कलम 279, 338 मोटर वाहन कायदा कलम 84, 134 (अ), 134 (ब) अन्वये गुन्हा दाखल करुन गावदेवी पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक भोसले यांनी दिलीय.
मॅगी आणायला जाताना कारची धडक : महालक्ष्मी मंदिर कंपाऊंड परिसरात राहात असलेल्या दोन चिमुकल्या येथील एका शाळेमध्ये दहावीत शिकतात. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास त्या मॅगी आणण्यासाठी रस्त्याच्या पलीकडं असलेल्या दुकानात जात होत्या. या दरम्यान रस्ता ओलांडत असताना एका सोनेरी रंगाच्या कारनं त्यांना जोराची धडक दिली. यात या दोघी गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर कार चालक मात्र पसार झाला. अखेर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देत दोघींना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा अपघात भुलाभाई देसाई रोडवर झाला असून अपघातानंतर कॅटबरी जंक्शनच्या दिशेनं ब्रीच कँडीकडं यातील आरोपी पळून गेला असून या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.