नाशिक Nashik swine flu News :डेंग्यूपाठोपाठ नाशिक शहरामध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढलाय. स्वाइन फ्लूमुळं नाशिकमध्ये आणखी दोन जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या पाच महिन्यात नाशिकमध्ये 28 बाधित असून आतापर्यंत 8 जणांचा स्वाइन फ्लूने बळी घेतलाय. मात्र असं असलं तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं नाशिक महानगरपालिका वैद्यकीय विभागाचं म्हणणं आहे.
24 तासांत दोघांचा मूत्यू :मे महिना संपत नाही तोच नाशिक शहरामध्ये डेंग्यूनं डोकं वर काढलं असताना आता स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात स्वाईन फ्लूमुळं नाशिकमध्ये आणखी दोघांचा बळी गेलाय. मृतांमध्ये शहरांमधील 50 वर्षीय पुरुष तर 42 वर्ष महिलेचा समावेश आहे. गेल्या पाच महिन्यात स्वाइन फ्लूचे 28 बाधित रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत 8 जणांचा बळी घेतलाय. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये उद्भवणारे आजार यंदा उन्हाळ्याच्या कडाक्यामध्येच डोकं वर काढताना दिसून येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चालू महिन्यामध्ये तब्बल 33 डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयामधील बाधितांची संख्या अद्याप समोर आलेली नाही. त्यातच आता स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्यानं आरोग्य यंत्रणाची डोकेदुखी वाढलीय.
भर उन्हाळ्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव :सर्वसाधारणपणे तापमान वाढल्यास स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होत नसतो. त्यात यंदा जानेवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा कायम आहे. यंदाच्या मे महिन्यात तर उकाड्यानं सर्वांना हैरान केलंय. शहरात तापमानाचा पारा 42 अंशापर्यंत पोहोचलाय. मात्र त्यानंतरही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कायम आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात स्वाइन फ्लूचे 23 बाधित रुग्ण आढळून आले. मे महिन्यात परिस्थिती नियंत्रणामध्ये असताना अचानक गेल्या आठवड्यात नाशिकमधील जेलरोड भागातील 58 वर्षीय सेवानिवृत्त एअर फोर्स कर्मचाऱ्याचा स्वाइन फ्लूनं मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्यूनंतर रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. तसंच दिंडोरीतील 42 वर्षीय महिलेला स्वाइन फ्लूची लागण झाल्यानं तिच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. आतापर्यंत 28 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांना सांगितलय.
महानगरपालिका म्हणते परिस्थिती नियंत्रणात :नाशिक शहरात स्वाईन फ्लू नियंत्रणात असून घाबरण्यासारखं कारण नाही. कोणालाही स्वाइन फ्लूची लक्षणं आढळल्यास नागरिकांनी अंगावर न काढता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असं आवाहन नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी केलं आहे.