पालघर Goods Train Derailed In Palghar : पालघर जिल्ह्यात मालगाडीच्या झालेल्या अपघातामुळे आज दुसऱ्या दिवशीही रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. डहाणू ते विरार रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प असून विरार चर्चगेट मार्गावरच्या गाड्या सुरळीत धावत आहेत. विरार डहाणू रेल्वे सेवा पुढील सूचना येईपर्यंत बंद राहतील, अशी अनाउन्समेंट विरार रेल्वे स्थानकात करण्यात येत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकल सेवेला या अपघाताचा मोठा फटका बसल्याचं दिसून आलं.
पालघरमध्ये मालगाडीचे सात डबे घसरले :लोखंडी कॉइल घेऊन विशाखापट्टणमहून गुजरातमधील करंबेलीकडं 43 वॅगनची मालगाडी जात होती. यावेळी पालघरमध्ये या मालगाडीचे 7 डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे मालगाडीतील लोखंडी कॉईल फेकल्या गेल्यानं मोठं नुकसान झालं. रुळावरून घसरलेले डबे आणि कॉइलमुळे ट्रॅक आणि ओव्हरहेड उपकरणांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे सगळी रेल्वेसेवा विस्कळीत झाली. हा अपघात झाल्यामुळे पश्चिम रेल्वेनं अनेक गाड्या रद्द करुन काही गाड्या वळवण्याची घोषणा केली. रुळावरून घसरलेले डबे घटनास्थळावरून हटवण्यात आले आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी बुधवारी वृत्तसंस्थेला दिली आहे. "मंगळवारी रात्रीपासून सिंगल लाइन ऑपरेशन सुरू केलं आहे. बोईसर-पालघर-केळवे स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर काही गाड्या चालवल्या जात आहेत," असंही ते म्हणाले.