ठाणे :ठाण्यातील एका रेस्टॉरंटमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सूर संगीत बार आणि रेस्टॉरंटमध्ये काहीजण मद्यप्राशन करण्यासाठी आले होते. मद्यप्राशन केल्यानंतर वेटर त्यांना बिल देण्यासाठी गेला असता, त्यांनी त्याच्यावर ग्लास फेकून हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मद्यपींनी यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी मद्यपींना चोप देत पोलीस ठाण्यात आणलं. या घटनेप्रकरणी हॉटेलच्या वेटरद्वारे आणि पोलिसांद्वारे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तीनही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बिल देण्यास नकार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल अरुण राय (वय - 29 वर्ष), मनोज विष्णू तिवारी(वय - 38 वर्ष) रा. वागळे इस्टेट ठाणे, योगेश लोकनाथ पाठक (वय - 32 वर्ष) अशी आरोपींची नावं आहेत. तीनही आरोपी रेस्टॉरंटमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी आले होते. मद्यप्राशन केल्यानंतर रेस्टॉरंटमधील वेटर बिल देण्यासाठी गेला, त्यावेळी आरोपींनी बिल देण्यास नकार दिला. बिल मागणाऱ्या वेटरवर काचेचं ग्लास फेकून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मद्यपींनी यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. तीनही आरोपींना ताब्यात घेत अटक केली.