ज्येष्ठ पत्रकार तथा माजी खासदार कुमार केतकर चंद्रपूर Kumar Ketkar On PM Modi :पंतप्रधाननरेंद्र मोदी हे 2014 ला निवडून आलेत आणि 2019 ला पण निवडून आले, म्हणजे लोकशाही असा त्याचा कोणीही अर्थ लावू शकतो. परंतु लोकशाही पद्धतीनं निवडून येऊन हुकूमशाही लादायची, असा जागतिक पातळीवरती एक मोठा प्रवाह आहे. असा पायंडा गेल्या 15 ते 20 वर्षांपासून जगभरात सुरू झाला. हंगेरी, टर्की अशा देशात हा प्रयोग झाला आहे. मात्र भारतासारख्या देशात अतिशय उग्र आणि प्रकट स्वरूपात हे सर्व सुरू आहे. ही निवडणुकीतून आलेली हुकूमशाही आहे, असा हल्लाबोल ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी चंद्रपुरात केला.
पंतप्रधान मोदी कुणाशीही संवाद साधत नाहीत :"मतदारांच्या भरवशावर निवडून यायचं आणि यानंतर आपली मतं, धोरणं त्यांच्यावर लादायची. चर्चा करायची नाही. पक्षाचं तर सोडा पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळासोबत देखील देखील चर्चा करीत नाहीत. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांशी तर त्यांचा संवादच नसतो. ते फक्त आपला कारभार प्रधानमंत्री कार्यालयातून पाहतात. त्यांचा प्रयत्न हा हुकूमशाही लादण्याचा आहे."
तर मोदींना पंतप्रधान पद सोडावं लागेल :"या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी सत्तेत येणार नाहीत. भाजपाला 200 च्या आतंच जागा मिळणार. त्यामुळे मोदींचे पंतप्रधान पदही जाणार. मात्र ते पंतप्रधानपद सोडणार नाहीत. यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करणार. म्हणूनच त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतलं," असंही कुमार केतकर म्हणाले.
प्रचाराची इतक्या खालची पातळी बघितली नाही :"लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं प्रचाराची खालची पातळी गाठली आहे. ज्या पद्धती भाजपा हा प्रचार करत आहे, अशी प्रचाराची पातळी भाजपानं यापूर्वी कधी गाठली नव्हती. अशा पद्धतीचा प्रचार करण्याची भाजपाची संस्कृती नव्हती. इतका वाह्यात, इतका फाजील आणि अशाप्रकारची पातळी मी कधीही पाहिलेली नाही. अटलबिहारी वाजपेयींच्या काळातही असं कधी घडलं नाही. एक पत्रकार म्हणून मी 1971 पासून निवडणुकांचं वृत्तलेखन केलं आहे, मात्र असं पहिल्यांदा घडतं आहे," असंही केतकर म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजुरा येथील सभेत मुनगंटीवार यांना विकासाचं शिलाजीत देऊ, असं वक्तव्य केलं होतं. तर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. यावरून कुमार केतकर यांनी प्रतिक्रिया दिली.
या फाजीलपणाचे मुख्य स्रोत पंतप्रधान मोदी :"2014 आणि 2019 मध्ये भाजपंची सत्ता आल्यापासून त्यांनी सर्व प्रकारची नैतिकतेची आणि सभ्यतेची पातळी सोडून दिलेली आहे. आपल्याकडं पूर्ण बहुमत असल्यानं आपण काहीही करू शकतो, असा अहंकार भाजपामध्ये शिरला आहे. त्यामुळेच असा प्रचार दिसून येत आहे. याचा खरा स्रोत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही प्रमाणात गृहमंत्री अमित शाह हे देखील आहेत," असाही आरोप केतकर यांनी केला.
हेही वाचा :
- खासदार निधीतून कुमार केतकरांची 10 रुग्णालयांना अडीच कोटींची मदत
- मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करा; कुमार केतकरांची मागणी
- विकासकामे न केल्याने मोदींच्या सभेत राष्ट्रवाद; खासदार कुमार केतकरांची टीका