मुंबई : राज्यात महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. जागा वाटपाची चर्चा सुरू असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत 96 विधानसभेच्या जागांबाबत चर्चा पूर्ण झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंगळवारी पुन्हा चर्चा करणार आहे. चर्चेनंतर उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी दिली आहे. ते नवी दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न -दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यात काहीही तथ्य नाही. भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव होईल. पराभवाच्या भीतीनं भाजपा अशी खेळी करत आहे. आमच्या पक्षाकडून अशा प्रकारे कोणतंही वक्तव्य केलं नाही. महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी आमच्या सर्वांचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत.
भाजपाचं हिंदू प्रेम नकली -एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाचं हिंदू प्रेम नकली आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि स्वयंभू विश्वगुरू असा प्रचार करण्यात आला. या ११ वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली, त्यात जास्त हिंदूच होते. बेरोजगारीला कंटाळून तरुणांच्या आत्महत्या झाल्या, त्यातही जास्त हिंदूच आहेत. भाजपाची सत्ता आली की हिंदूंवर अन्याय केला जातो हे लपून राहिलं नाही. भाजपाचं हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. छत्रपती संभाजीनगर असं नामकरण केलं असं जाहीरपणे सांगायचं आणि उमेदवारांच्या यादीत औरंगाबाद लिहायचं ही दुतोंडी भूमिका आहे. काँग्रेस पक्षाची सर्वधर्म समभावाची स्पष्ट भूमिका आहे, असंही नाना पटोले म्हणाले.
शरद पवार यांची मध्यस्थी - महाविकास आघाडीत जागा वाटपावर ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात मतभेद वाढल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये कालपासून झळकत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष वेगळी भूमिका घेतो की शिवसेना वेगळी भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विदर्भातील काही जागांवर ठाकरे दावा करत असल्यामुळं वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेमध्ये मध्यस्थी करून जागा वाटपाच्या तिढ्यावर मार्ग काढणार असल्याचं समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकी काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेची काय भूमिका असेल याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष असणार आहे.
हेही वाचा...
- " जागावाटप उद्या होणार, महाविकास आघाडीपेक्षा महायुती..."-नाना पटोले
- महाराष्ट्रातील राजकारणात महिलांना दुय्यम स्थान; 'महिलाराज' फक्त नावालाच, जाणून घ्या आकडेवारी