अमरावती Historical Wada story : अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यात शिरजगाव बंड येथे 84 खांब आणि 11 खोल्या असणारा 100 वर्ष जुना देशमुख वाडा हा जितका भव्य आहे तितकाच तो साहित्यिक, शिक्षण संस्था संचालक आणि राजकीय मंडळींसाठी हक्काचा वाटणारा म्हणून ओळखला जातो. गो. नी. दांडेकर यांनी 'पूर्णामायची लेकरं' हे पुस्तक याच वाड्यात बसून लिहिलं. 'जाणता राजा' या महानाट्याची संकल्पना देखील याच वाड्यातून उदयास आली. एकेकाळी साहित्यिक आणि राजकारण्यांची रेलचेल असणाऱ्या या वड्यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
वाड्याचं असं आहे वैशिष्ट्य : चांदूर बाजार पासून मैल-दीड मैल अंतरावर शिरजगाव बंड या गावात सुमारे 100 वर्षांपूर्वी नारायणराव अमृतराव देशमुख यांनी भव्य वाडा बांधला. सागवान वृक्षाच्या 84 खांबांवर हा दुमजली वाडा उभारण्यात आला. या वाड्यात एकूण 11 खोल्या आहेत. या वाड्याच्या मध्यभागात असणारा भव्य चौक या वाड्याचं खास वैभव स्पष्ट करणारा आहे. या ठिकाणी सहा नक्षीदार खांब आणि मध्ये असणारा पाण्याचा कारंजा या वाड्याची भव्यता सांगतो. वाड्यातील या चौकासमोर देवघरात गणपतीची सुंदर मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. जुन्या काळातील स्वयंपाक घर, दिवाणखाना, अडगळीतल्या वस्तू ठेवण्यासाठी खास दालन, शेतातून आलेलं धान्य ठेवण्यासाठी खास मोठ्या खोल्या असं वैशिष्ट्य या वाड्याचं आहे.
इतिहासाची साक्ष देणारा एक सुंदर वाडा (ईटीव्ही भारत बातमीदार) भूत बंगला म्हणून ओळखला जायचा वाडा - शिरजगाव बंड येथील हा वाडा नारायणराव देशमुख यांनी उभारला. यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे नानासाहेब देशमुख हे अवघे पाच वर्षांचे असताना नारायणरावांचं निधन झालं. नानासाहेबांच्या आई देखील लवकरच गेल्या. यानंतर नानासाहेब देशमुख यांचं शिक्षण त्यांच्या बहिणीकडे झालं. पुढे साहित्याची आवड असल्याने नानासाहेब देशमुख यांनी अमरावतीत 'नागविदर्भ आणि 'महाराष्ट्र प्रकाशन' या दोन प्रकाशन संस्था सुरू केल्या. त्यांचं लग्न वसुधा देशमुख यांच्यासोबत झालं. या संपूर्ण कालखंडात शिरसगाव बंड येथील देशमुखांचा वाडा पूर्णतः बंद होता. या वाड्याची रचना अशी आहे की या ठिकाणी कुठल्याही भागात जोरात आवाज केला तर त्याचा प्रतिध्वनी परत ऐकू येतो. बराच काळ बंद असणाऱ्या या वाड्यात अनेकांना आपलाच आवाज परत ऐकायला यायचा यामुळे अनेक वर्ष भुताचा वाडा म्हणून या वाड्याकडे ग्रामस्थ फिरकलेच नाहीत.
वाड्याचं केलं नूतनीकरण - गावात बरीच वर्ष बंद असणारा हा वाडा भूत बंगला म्हणूनच ओळखला जायचा. 12 मार्च 1962 रोजी नानासाहेब देशमुख यांचं लग्न वसुधा देशमुख यांच्याशी झालं. यानंतर ते या वाड्यात आले तेव्हा या वाड्याची अवस्था अतिशय वाईट होती. या वाड्याचं नूतनीकरण करण्याचं ठरवलं. वसुधा देशमुख यांचे भाऊ एल.वाय. देशमुख हे स्थापत्य अभियंता होते. त्यांच्याकडेच या वाड्याच्या नूतनीकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावेळी हा संपूर्ण वाडा सहा महिने जॅक लावून वर उचलून घेतला. त्या स्थितीतच वाड्यात नव्याने दुरुस्ती करण्यात आली. लगतच्या मोकळ्या जागेत नवं स्वयंपाक घर, बैठक खोली बांधण्यात आली. वड्याचं सौंदर्यीकरण झाल्यावर नानासाहेब देशमुख आणि वसुधा देशमुख हे या ठिकाणी राहायला आले. कधी अमरावतीच्या घरात तर कधी शिरजगाव बंड येथील वाड्यात त्यांचं वास्तव्य होतं. दरवर्षी गौरी महालक्ष्मीची स्थापना या वाड्यात व्हायला लागली ती परंपरा आज देखील कायम आहे.
वाड्यात गो. नी. दांडेकरांनी लिहिलं पुस्तक -उत्कृष्ट साहित्य निर्मिती करणारे गो. नी. दांडेकर यांनी 'पूर्णामायची लेकरे ' हे पुस्तक देशमुखांच्या याच वाड्यात तब्बल सहा महिने मुक्काम ठोकून लिहिलं. त्यावेळी पायटांगीद्वारे गो. नी. दांडेकर हे पूर्णा नदीवर जायचे. पूर्णा नदीत अंघोळ करणं, घरी येऊन नाश्ता केल्यावर लिहीत बसणं हा त्यांचा सलग सहा महिन्याचा नित्यक्रम असायचा. दांडेकरांच्या 'पूर्णामायची लेकरे' या पुस्तकातील बहुतांश पात्रं ही आमच्या घरात काम करणारे लोकच आहेत अशी माहिती वसुधा देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
या वाड्यात पुढे आली जाणता राजाची संकल्पना -माजी मंत्री वसुधा देशमुख यांचे पती नानासाहेब देशमुख हे साहित्यप्रेमी आणि दिलदार व्यक्तिमत्व होते. प्रकाशन संस्थेच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातील अनेक साहित्यिकांशी त्यांचा संपर्क यायला लागला. यामुळे राज्यभरातून येणाऱ्या साहित्यिक आणि कलावंतांसोबत त्यांची चांगली गट्टी जमायची. बाबासाहेब पुरंदरे हे पहिल्यांदा अमरावतीत 1963 साली राजा शिवछत्रपती या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आले होते. त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांचं नेहमीच अमरावतीला येणं व्हायचं. नानासाहेब देशमुख यांच्या अमरावतीच्या घरी किंवा अनेकदा शिरजगाव बंड येथील या वाड्यात देखील बाबासाहेब पुरंदरे यायचे. 1981-82 मध्ये बाबासाहेब पुरंदरे नानासाहेब देशमुख यांच्या शिरसगाव बंड येथील वाड्यात मुक्कामी असताना छत्रपती शिवाजी महाराजांवर तुम्ही व्याख्यान देता मात्र पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळावेत यासाठी भव्य कलाकृती निर्माण करण्याबाबत विचार करावा असं मी त्यांना म्हटलं. त्यावेळी या वाड्यातच बाबासाहेब पुरंदरे यांना जाणता राजाची संकल्पना सुचली. पुढे अवघ्या दोन-तीन वर्षात 1985 मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा हे भव्य महानाट्य निर्माण केलं अशी माहिती देखील वसुधा देशमुख यांनी दिली. जाणता राजाचा पहिला प्रयोग पुण्याला झाला. राज्यात महायुतीचे सरकार असताना दादरला झालेल्या जाणता राजाच्या प्रयोगादरम्यान बाबासाहेब पुरंदरे यांनी नानासाहेब आणि मला मंचावर बोलावून आमचा यांनी सत्कार केला अशी आठवण देखील वसुधा देशमुख यांनी सांगितली.
या मुख्यमंत्र्यांनी दिली वाड्याला भेट - वसुधा देशमुख या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या असल्यानं काँग्रेसचे अनेक नेते शिरजगाव बंड येथील त्यांच्या वाड्यात येऊन गेलेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे हे देखील या वाड्यावर येऊन गेलेत. गझलसम्राट सुरेश भट यांच्या गजलांची अनेकदा मैफल या वाड्यात झालीय. गो. नी. दांडेकर यांच्यासह वा. कृ. चोरपडे, ग. त्र्यं. माडखोलकर, उमाकांत ठोंबरे, प्रकाश रंजन, वि.भी. कोलते, मधुकर केचे, प्रा. बी.टी. देशमुख अशा अनेक नामवंतांनी या वाड्याला भेट दिली असं वसुधा देशमुख म्हणाल्या.
वाडा आजही बळकट -शंभर वर्ष जुना असणारा शिरजगाव बंड येथील देशमुखांचा हा वाडा आज देखील बळकट आहे. या वाड्याचं पूर्णतः नूतनीकरण करण्यात आलं असून वेळोवेळी या वाड्याची डागडुजी केली जाते. वाड्या लगतच असणारा गायवाडा हा देखील अतिशय भव्य आहे. वाड्याला अगदी लागून आणि वाड्याच्या वरच्या मजल्यावरुनच गाभाऱ्यातील देवांचे दर्शन होईल असं भव्य श्रीरामाचं मंदिर वसुधा देशमुख यांनी उभारलं आहे. गौरी महालक्ष्मी, दसरा, दिवाळी अशा सणांच्या दिवशी वाड्यात लगबग असते.
हेही वाचा..
- एका छताखाली 451 गणरायांचं दर्शन; अमरावतीच्या खंडेलवाल कुटुंबाचा अनोखा उपक्रम, पाहा व्हिडिओ...
- मेळघाटातील दुर्गम गावात वसलेल्या चिमुकल्यांना मिळालं वर्षभराचं शैक्षणिक साहित्य; अकोल्याच्या सेवा संस्थेचा पुढाकार