ठाणे: शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकी भरधाव वेगात चालवून हॉर्न वाजवण्याच्या रागातून एकाची भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर तीन भागातील शांतीनगर परिसरात असलेल्या रेमंड शोरूमच्या समोरील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज हिरामण निकम असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर सचिन आनंद दिघे उर्फ बबल्या असं मुख्य आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर औताडे यांनी दिली.
कशी घडली घटना? :मिळालेल्या माहितीनुसार, मृत पंकज निकम हे उल्हासनगर मधील शांतीनगर भागात पत्नी आणि लहान मुलीसह राहत होते. मृत पकंज यांची सासुरवाडी शांतीनगर परिसरात असलेल्या गहूबाई पाड्यात आहे. २८ डिसेंबरच्या रात्री त्यांच्या मेव्हण्याचा जागरण गोंधळ कार्यक्रम होता. हा कार्यक्रम रात्रभर सुरू असल्यानं ते रविवारी पहाटे मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी दुचाकीवरून एकटेच गेले होते. त्याच दरम्यान मुख्य आरोपी सचिन उर्फ बबल्या हा साथीदारांसह शांतीनगर परिसरात असलेल्या रेमंड शोरूमच्या समोरील रस्त्यावर उभा होता. मृत पंकज यांनी भरधाव वेगात दुचाकी चालवत हॉर्न वाजल्याच्या राग आरोपीला आल्यानं त्यानं दुचाकी अडवली. त्यानंतर अचानक लाथाबुक्यांनी जबर मारहाण करत पंकज यांची हत्या केली. यावेळी पंकज यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर औताडे यांनी दिली.