ठाणे Thane Crime News : भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर महाविद्यालया समोरच तीन विद्यार्थ्यांनी चाकू हल्ला केल्याची घटना घडलीय. यातील जखमी विद्यार्थ्यानं दहावीची परीक्षा सुरू असताना वर्गात आरोपी विद्यार्थ्याना प्रश्नांची उत्तरं देण्यास नकार दिला होती. याच वादातून त्या 16 वर्षीय विद्यार्थ्याला भर रस्त्यात चाकूनं भोसकून हल्लेखोर विद्यार्थी फरार झाले. तसंच न्यायालयात केलेला दावा मागं घेण्यासाठी एका शिक्षिकेला भर भररस्त्यात बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या दोन्ही घटनांमुळं विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे. या दोन्ही घटनांची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यावर चाकूहल्ला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारा विद्यार्थी भिवंडी शहरात कुटुंबासह राहतो. या जखमी विद्यार्थ्याची सध्या दहावीची परीक्षा सुरू असून तो 26 मार्च रोजी परीक्षा केंद्रातील वर्गात पेपर लिहित असताना एका हल्लखोर विद्यार्थ्यानं त्याच्याकडे प्रश्नाचं उत्तर देण्याचा तगादा लावला होता. मात्र जखमी विद्यार्थ्यानं वर्गात परीक्षा सुरू असल्यानं प्रश्नांची उत्तरं देण्यास नकार दिला. याच वादातून हल्लेखोर विद्यार्थ्याला राग आला. त्यानंतर परीक्षा संपल्यावर दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास सर्वजण वर्गातून बाहेर पडत महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर येताच तीन विद्यार्थ्यांनी आपसात संगनमतानं त्याला ठोश्याबुक्क्यांसह चाकूहल्ला करुन गंभीर जखमी केलं. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तिन्ही हल्लेखोर विद्यार्थ्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केलाय.