पुणे Teacher Molested a Student : बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच निगडीत असाच धक्कादायक प्रकार समोर आलाय. सहा वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या पीटीच्या शिक्षकानं या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच शाळेतील तेरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग करुन तिचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी शिक्षकासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)
पालकांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल : या प्रकरणात मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी शिक्षक आणि संबंधित शाळेच्या संचालकांविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक केली आहे. निगडी प्राधिकरणातील शाळेत ही धक्कादायक घटना घडली. शाळेतील पीटी शिक्षक निवृत्ती देवराम काळभोरने एका विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग करून तिचा लैंगिक छळ केला. 2022 ते 2024 या दोन वर्षांत मुलीचा वारंवार छळ करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय.
पोक्सो अंतर्गत कारवाई :आरोपी निवृत्ती काळभोर याच्याविरुध्द निगडी पोलीस ठाण्यात 2018 मध्ये शाळेतील एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात त्याला न्यायालयानं शिक्षा देखील सुनावली होती. हे माहीत असताना देखील शाळेच्या संचालकांनी काळभोर याला पुन्हा कामावर रुजू केलं. त्यामुळं या प्रकरणात निगडी पोलिसांनी शाळेचे प्राध्यापक अशोक जाधव, रोहिदास बलभीम जाधव, लक्ष्मण नामदेव हेंद्रे, अविंद्र अंकुश निकम, गोरख सोपान जाधव, हनुमंत दादा निकम आणि शुभांगी अशोक जाधव अशा इतर सात आरोपींना देखील बाल अत्याचाराच्या गुन्ह्यात आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
हेही वाचा -
- चौथीतील 3 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार: जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा प्रताप, पोलिसांनी ठोकल्या बेड्या - ZP School Teacher Abused Girls
- अनाथ आश्रमात रहाणाऱ्या चिमुरडीला दिले चटके, संस्था चालकाला पोलीस कोठडी - little girl tortured
- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : निलंबित पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची मुंबईत बदली, उलट सुलट चर्चांना उधाण - Badlapur Sexual Abuse Case