ठाणे Teacher Abused Girls In Thane :बदलापूरची घटना ताजी असतानाच त्यानंतर अकोल्यातही 8 वीतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली. आता पुन्हा गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका महापालिका शाळेत घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे नराधम शिक्षकानं पीडित विद्यार्थिनींना अश्लील चित्रफीत दाखवून लगट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात 40 वर्षीय आरोपी शिक्षकाच्या विरोधात पोक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करुन त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
12 वर्षीय विद्यार्थिनीला दाखवली अश्लील चित्रफीत :पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 12 वर्षीय मुलगी भिवंडी शहरातील महापालिकेच्या एका शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याच शाळेतील तिच्या वर्गात 40 वर्षीय नराधम शिक्षकाला अश्लील चित्रफीत पाहण्याची सवय जडली. त्यामुळे तो शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींना शाळेतच अश्लील चित्रफित दाखवून विद्यार्थिनींना केळी आणि मोसंबी आणून ती फळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर फिरवून लगट करत त्यांचा विनयभंग करत असल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईनं आज 28 ऑगस्ट रोजी दिली आहे. तर पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असतानाही मुली शाळेत जात नसल्यानं याची विचारणा पालकांनी केल्यानं हा विनयभंगाच्या अश्लीलतेचा प्रकार उघडकीस आला आहे.