नाशिक :राजकीय नेत्यांची ओळख असल्याचं सांगून फसवणूक झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. आता तामिळनाडू येथील एका शास्त्रज्ञाला 5 कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. राजकीय नेत्यांसोबत ओळख असल्याचं सांगत राज्यपाल पद मिळवून देतो, असं सांगून या शास्त्रज्ञाकडून तब्बल 5 कोटी रुपयांची रोकड घेत फसवणूक करणाऱ्याला मध्यवर्ती गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. नीरज कुलकर्णी असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
राजकीय ओळखीचा गैरफायदा : रेल्वेत नोकरी लावतो, शासकीय सेवेत नोकरी लावतो, लष्करात नोकरी लावतो, असं आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र, आता चक्क राज्यपाल पदाचं आमिष दाखवून 5 कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. तामिळनाडू येथील शास्त्रज्ञ नरसिम्मा रेड्डी यांना राज्यपाल पदाची ऑफर देत सर्व्हिस चार्ज म्हणून 5 कोटी 8 लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी नाशिक येथील रहिवाशी निरंजन सुरेश कुलकर्णी याला अटक करण्यात आलीय. निरंजनचं शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे. राजकीय पक्षासह संघटनांमध्ये काम करताना त्याने राजकीय ओळखीचा गैरफायदा घेतलाय तसंच आर्थिक फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
अशी झाली ओळख :नरसिम्मा रेड्डी हे नाशिकला एका नातेवाईकांच्या पूजा विधीसाठी आले होते. त्या दरम्यान त्यांची निरंजन सुरेश कुलकर्णी याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर निरंजनने नरसिम्मा रेड्डी यांना जानेवारीमध्ये शहरातल्या एका आलिशान हॉटेलमध्ये बोलावलं होतं. त्यावेळी निरंजनने मी कोणत्याही राज्याचे राज्यपाल पद मिळवून देऊ शकतो, त्यासाठी मला 15 कोटी रुपयांचा सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल असं, रेड्डी यांना सांगितलं. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रेड्डी यांनी 5 कोटी 8 लाख रुपये निरंजनला दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.