मुंबई Swapna Patkar On Uddhav Thackeray : बदलापूरमध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर आल्यानंतर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महिला सुरक्षेबाबत आंदोलन केलं. यानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आल्यामुळे पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यासोबत उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांनी न्यायाची अपेक्षा केली असून त्या वाट बघत असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. सोशल मीडियावर त्यांनी हे पत्र पोस्ट केलं आहे.
संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप :माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढं करत महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंद संदर्भात उच्च न्यायालयानं कडक शब्दात ताशेरे ओढल्यानंतर त्यांनी तो बंद मागं घेतला. परंतु राज्यभर महाविकास आघाडीकडून मूक निदर्शनं करण्यात आली. यामध्ये उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी झाले. या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करुन मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2022 ला स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप वायरल झाली. त्या क्लिपमध्ये संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला. या सर्व प्रकरणाची स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना आठवण करुन दिली. संजय राऊत हे त्यांच्यासोबत ज्या पद्धतीनं वागले आहेत, त्यावर बोला, असं स्वप्ना पाटकर यांनी या पत्रात नमूद केलं आहे.