सिंधुदुर्ग-नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. हा शिवरायांचा पुतळा नेमका कशामुळे कोसळला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या कार्याला मानवंदना करण्याकरिता शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होतेय.
आमदार वैभव नाईक यांनी फोडले बांधकाम कार्यालय (Source - ETV Bharat) - राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करून निषेध केला.
कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी-सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे, हे आता उघड झाले आहे. ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
कार्यालयाची तोडफोड करत तीव्र निषेध -राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज दुपारी वादळी वारे, आणि मुसळधार पावसात कोसळला. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा शिवप्रेमींनी आरोप केला. पुतळा कोसळण्याच्या घटनेला नौदल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला. बांधकाम विभागाकडून बोगस कामे होत असल्याचा आरोप करत आमदार वैभव नाईक यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी कार्यालयाची तोडफोड करत तीव्र निषेध केला.
शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर इतिहासकार इंद्रजीत सावंत यांची पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले, " हा पुतळा बसवला त्याचवेळी माझ्यासारख्या अभ्यासकानं या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल तसेच मजबुतीबद्दल आक्षेप घेतला होता. हा पुतळा शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारत नाही. याबद्दलही त्यावेळेला आम्ही पोस्ट लिहून लोकांसमोर आलेलो होतो. पण याकडे सबंधितांकडून दुर्लक्ष करण्यात आलं होतं. त्यानंतर 3-4 फेब्रुवारी 2024 ला मी पुतळ्याला भेट दिल्यानंतर हा पुतळा जास्त काळ टिकणार नाही, असं सांगितलं होतं. हे शिल्प बदलावे असे निरीक्षण नोंदवले होते."
निवडणुकीच्या घाईत..- नौदलासारख्या प्रख्यात आस्थापनेनं केलेले काम हे चिरंतन व्हायला पाहिजे. ते मजबूत आणि सुंदर असायला हवं होतं. भारताचे पंतप्रधान जर एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करत असतील, ती आंतरराष्ट्रीय बातमी होत असेल तर त्याच्या मजबूतीकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे होते. शिवछत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता. पण हे करत असताना या पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबुतीकरण याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला.
भारतीय नौदलाची काय प्रतिमा झाली असेल!शिवछत्रपतींचे स्मारक हे जमीनदोस्त झालेलं पाहून भारताची - भारतीय नौदलाची काय प्रतिमा झाली असेल! याचा आपण विचार करावा. ते पुतळे कालांतराने असेच पडणार असतील, तर अशी स्मारके आपण उभी करावीत का? याचाही शिवप्रेमींनी विचार करावा. हा पुतळा तयार करण्यासाठी आणि हा पुतळा मंजूर केला त्या एजन्सी आणि पुतळा बसवणारे यांच्या हेतूविषयी आता आपल्याला शंका घेण्यास जागा आहे. ज्यांनी हा अपराध केला त्यांना आपण शिक्षा करणार आहोत का, असा प्रश्नदेखील इतिहासकार सावंत यांनी फेसबुक पोस्टमधून सरकारला विचारला आहे.
हेही वाचा-
- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण