पुणे Rupali Chakankar On Badlapur Case : बदलापूरमध्ये दोन चारवर्षीय चिमुकलींवर नराधमानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं बघायला मिळतंय. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीय. तर या प्रकरणावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? : यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यानं तक्रार घेण्यास विलंब केला त्यालाही निलंबित करण्यात आलंय." बदलापूरमधील एका शाळेत स्वच्छतागृहामध्ये दोन चिमुकलींवर अत्याचार झाला. यावर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटलं,"अशा घटना घडू नये यासाठी राज्य महिला आयोगाच्यावतीनं शालेय स्तरावर विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मात्र, अशा घटनांमध्ये होणारी वाढ पाहता पालकांनीदेखील जागरुक राहावं," असं आवाहन रुपाली चाकणकर यांनी पालकांना केलंय.