महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोण होते 'पद्मश्री' डॉ. शिवाजीराव पटवर्धन?; विशेष उपक्रमातून नव्या पिढीला करून देणार दाजीसाहेबांची ओळख

डॉ. शिवाजीराव (दाजीसाहेब) पटवर्धन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशानं विदर्भ महारोगी सेवा मंडळ 'तपोवन'च्या वतीनं विशेष उपक्रम राबवण्यात आलाय.

special programme held in Amravati for introduce Dr Shivajirao Patwardhan to new genration
डॉ. शिवाजीराव पटवर्धन जयंती (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2024, 2:09 PM IST

अमरावती : आपल्या जिल्ह्यात, आपल्या परिसरात एखादी थोर व्यक्ती होऊन गेली आणि नव्या पिढीला तिच्याबाबत हवी तशी माहिती नसावी ही बाब खेदजनकच आहे. यामुळंच अमरावतीत होऊन गेलेले थोर स्वातंत्र्य सेनानी आणि कुष्ठरुग्णांसाठी माय-बाप होऊन त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे जगण्याचा हक्क देणारे डॉ. शिवाजीराव (दाजीसाहेब) पटवर्धन यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशानं विदर्भ महारोगी सेवा मंडळ 'तपोवन'च्या वतीनं जिल्ह्यातील 28 शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना दाजीसाहेबांच्या कार्याची ओळख करून दिली जाणार आहे. 28 डिसेंबर 2024 ला दाजीसाहेबांची 134 वी जयंती असून त्यानिमित्तानं 28 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर असा हा उपक्रम राबवला जाणार आहे.

असा आहे उपक्रम :अमरावती शहर आणि जिल्ह्यातील नामांकित 28 शाळांमध्ये 'तपोवन' संस्थेतील मंडळी स्वतः जाऊन डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या कार्याची माहिती व्याख्यान स्वरुपात विद्यार्थ्यांसमोर मांडणार आहेत. प्रश्नोत्तर स्वरुपात विद्यार्थ्यांना अमरावती शहरालगत डोंगराळ भागात वसलेल्या तपोवनात एका आगळ्यावेगळ्या आणि आदर्श गावाची माहिती देखील दिली जाणार आहे. तसंच दाजीसाहेबांवरील एक पुस्तक प्रत्येक शाळेत भेट स्वरुपात दिलं जाणार आहे. या माध्यमातून नव्या पिढीनं कुष्ठरोग मुक्तीसाठी आयुष्यभर कार्यरत व्यक्तीचं आयुष्य जाणून घ्यावं हा खऱ्या अर्थानं या उपक्रमाचा उद्देश आहे, असं 'तपोवन' संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.

विदर्भ महारोगी सेवा मंडळ अध्यक्ष डॉ. सुभाष गवई यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

देश स्वतंत्र झाल्यावर कुष्ठरुग्ण सेवा हाच ध्यास :देश स्वतंत्र व्हावा यासाठी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. तुरुंगवास भोगला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. राधाकृष्णन यांच्यासारखे राजकीय सहकारी त्यांना लाभले. देश स्वतंत्र झाल्यावर त्यांना राजकीय पद सहज प्राप्त झालं असतं. मात्र, महात्मा गांधी यांनी कुष्ठ रुग्णांच्या सेवेसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी 1950 मध्ये केवळ चार कुष्ठरोग्यांसोबत अमरावतीत 'तपोवन' उभारलं.

'तपोवन' म्हणजे आदर्श सेवाधाम :अमरावती शहरालगत पहाडांच्या मध्यावर डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी 'तपोवना'ची स्थापना केली. या ठिकाणी देशभरातील कुष्ठ रुग्णांना त्यांनी जगण्याची नवी दृष्टी दिली. तपोवनात विविध उद्योगधंद्यांना सुरुवात केली. सुतार काम, लोहार काम, प्रिंटिंग प्रेस आदी माध्यमातून कुष्ठरुग्ण स्वतःच्या मेहनतीनं या ठिकाणी वस्तू तयार करायला लागले. तपोवनातील वस्तूंना बाजारपेठ मिळावी, यासाठी दाजीसाहेबांनी शासनाला आदेश काढायला लावून सर्व शासकीय कार्यालयात लागणाऱ्या फर्निचरच्या ऑर्डर या तपोवनला मिळवून दिल्या. अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे मुद्रणालय देखील 'तपोवना'त सुरू झालं. 'तपोवन' परिसरात विविध मंदिरं आणि उद्यान उभारण्यात आले असून कुष्ठ रुग्णांचे एक आदर्श गाव अशी 'तपोवन'ची ओळख आहे.

नव्या पिढीला सामाजिक कार्य कळावं : पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी जवळपास 75 हजार कुष्ठ रुग्णांना जगण्याची नवी दिशा दाखवली. हे कार्य करतांना त्यांचे अनेकदा शासनासोबत देखील वाद होत राहिले. यामुळंच दाजी पटवर्धन यांनी 19 ऑक्टोबर 1984 रोजी स्वतःची संपूर्ण 'तपोवन' संस्था शासनाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संस्थेची मालमत्ता (पाच कोटी रुपये) आणि अकराशे एकर जमीन त्यांनी 10 नोव्हेंबर 1984 ला शासनाच्या स्वाधीन केली. आपल्या स्वतःची इतकी मोठी संस्था एका क्षणात डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी सोडून दिली. त्यांचं कार्य अतिशय मोलाचं असून नव्या पिढीला ते कळावं, या उद्देशानं आम्ही प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचून त्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न करतोय, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी दिली.

हेही वाचा -

  1. राष्ट्रसंतांनी उभारलं गुरूंचं मंदिर, अडकोजी महाराजांची समाधी म्हणजे 'पावर हाऊस'
  2. 100 कोटी वर्षांपूर्वीच्या गुहेत 2 हजार वर्षांपासून केली जातेय 'अंबादेवी'ची पूजा; जाणून घ्या पौराणिक कथा

ABOUT THE AUTHOR

...view details