मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार असताना खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा कट रचल्याचे षडयंत्र आखलं गेलं होतं, असा आरोप भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. सरकारनं या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली.
एसआयटीची स्थापना : कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथक या प्रकरणाची चौकशी करणार आहे. राज्य सरकारनं शासन निर्णय ३१ जानेवारीला काढलाय. तपास पथकाला अहवाल सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
प्रवीण दरेकरांनी केली होती चौकशीची मागणी : भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एक पेन ड्राईव्ह सादर केला होता. या पेन ड्राईव्हमध्ये सदर षडयंत्राचं स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा त्यांनी केला होता. पेन ड्राईव्ह सादर केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. सभागृहात मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारतर्फे उत्तर देताना एसआयटी स्थापन केली जाईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं एसआयटीची स्थापना केली.
काय होतं नेमकं प्रकरण? : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अटक करून अडचणीत आणण्याचा डाव होता, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला होता. फडणवीस व शिंदे यांना अडकवण्याची जबाबदारी एका डीसीपी लेवलच्या अधिकाऱयावर दिली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिंदे यांचं वर्चस्व वाढत होतं म्हणून सूडबुद्धीनं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, असा दावाही प्रवीण दरेकर यांनी केला होता.
हेही वाचा -
- 'ऑपरेशन टायगर' जुनंच मिशन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, "पालकमंत्रिपदाचा तिढा..."
- दिल्ली विधानसभा निवडणूक 2025: देवेंद्र फडणवीसांचा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल; नेमकं काय-काय म्हणाले?
- विजय वडेट्टीवारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडं आणला होता स्वतःचा प्रस्ताव; सामंत यांचा गौप्यस्फोट, छावा चित्रपटाबाबतही मोठा खुलासा