पुणे Kailash Kher On PM Narendra Modi : प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात. माझं आयुष्य तर संकटांनी घेरलेलं होतं. त्यावेळी मी जीवदेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता माझा पुनर्जन्म झाला, असं वक्तव्य प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी केलंय. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्याशी वार्तालाभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
काय म्हणाले कैलाश खेर? :यावेळी बोलत असताना कैलाश खेर म्हणाले की, "माझ्या आयुष्यात एकवेळ अशी आली होती की मला संकटांनी घेरलं होतं. तेव्हा मी गंगेत उडी देखील मारली होती. पण आता माझा पुनर्जन्म झालाय. मी मुंबईत आल्यावर देखील अनेकदा समुद्राशी गप्पा मारायचो. एका अतिसंवेदनशील मनुष्याला आपण असंवेदनशील धर्तीवर का पाठवलं? असा प्रश्न मी नेहमी समुद्राला विचारायचो." तसंच प्रसिद्ध होण्याचं कोणतंही सूत्र नसून जे फक्त प्रसिद्धीसाठी जगत असतात त्यांच्याबरोबर परमेश्वर देखील खेळत असतो. म्हणून प्रसिद्ध होणं आपलं लक्ष नसून साधना हे आपलं लक्ष असलं पाहिजे, असंही खेर यावेळी म्हणाले.