कोल्हापूर Shivsena National Convention :कोल्हापुरातील गांधी मैदानावर शनिवारी जाहीर सभेने या दोन दिवसीय अधिवेशनाची सांगता होणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. 'यायला लागतंय' या टॅगलाईन खाली शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी होत आहे. शुक्रवारी सकाळी नाव नोंदणीपासून या अधिवेशनाला प्रारंभ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन मुख्य राष्ट्रीय अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. दिवसभरात चार सत्रात होणाऱ्या अधिवेशनात संघटनात्मक विषय, राजकीय विषय आणि सरकारी योजनेची कार्यशाळा होणार आहे.
असं असेल कार्यक्रमाचं नियोजन:पहिल्या दिवसाची सांगता स्नेहभोजनानं होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, लोकसभा सदस्य, पदाधिकारी, करवीर निवासिनी आई अंबाबाईचे शनिवारी दर्शन घेणार आहेत. यानंतर अधिवेशनस्थळी पहिल्या सत्रात निवडणूक व्यवस्थापन प्रशिक्षणाने राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता होणार आहे. सायंकाळी कोल्हापूर सह राज्यातून येणाऱ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत गांधी मैदानात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला लाखो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती राष्ट्रीय महाअधिवेशनाचे संयोजक आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
आगामी लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार:आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणी आणि निवडणूक कार्यक्रम पदाधिकारी कार्यकर्त्यांना या राष्ट्रीय अधिवेशनातून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना या राष्ट्रीय अधिवेशनातून कोणता कानमंत्र देतात? यासह याच अधिवेशनातून लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना रणशिंग फुंकणार असल्यानं या अधिवेशनाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.