मुंबई Raju Waghmare on Jitendra Awhad : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील काही श्लोकांचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या मनुस्मृतीतील श्लोकांवर विरोधकाकडून विरोध होत असतानाच, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड इथं मनुस्मृतीचं दहन करत असताना त्यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आला. यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका होत आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत असल्याचं शिवसेना सहमुख्य प्रवक्ते राजू वाघमारे यांनी म्हटलंय. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतलली त्यावेळी ते बोलत होते.
राजू वाघमारे (ETV Bharat Reporter) आव्हाडांवर गुन्हा दाखल : दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्या विरोधात अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. आव्हाडांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आव्हाड यांच्यासह एकूण 24 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आव्हाड यांना अटक व्हावी : या पत्रकार परिषदेत बोलताना वाघमारे म्हणाले, "जितेंद्र आव्हाड हे प्रत्येक कार्यक्रमातून 'जय भीम जय भीम' बोलत असतात. तसंच आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे मोठे अनुयायी आहोत हे सतत दाखवत असतात. मात्र त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो फाडला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो." तसंच जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना अटक व्हावी, अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचं राजू वाघमारे यांनी म्हटलंय. जरी त्यांनी माफी मागितली असली तरी त्यांचे मगरीचे अश्रू आहेत. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही असंही राजू वाघमारे म्हणाले.
जिभेला आळा बसावा म्हणून नोटीस : दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी सामनाच्या रोखठोक अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केलाय. एका लोकसभा मतदारसंघात 25-30 कोटी रुपये वाटले असा आरोप संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय. या आरोपाची गंभीर दखल शिवसेनेनं घेतली असून, राऊत यांनी केलेल्या आरोपांबद्दल नोटीस पाठवलीय. तीन दिवसांच्या आत माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा असं या नोटीसमध्ये म्हटलंंय. पत्रकार पोपट याच्या जिभेला आळा बसला पाहिजे, म्हणून नोटीस पाठवली असून राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं वाघमारे म्हणाले.
हेही वाचा :
- सावरकरांवरील आक्षेपार्ह वक्तव्य राहुल गांधींना भोवणार? पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली महत्त्वाची माहिती - RAHUL GANDHI News