महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक, उच्चशिक्षित तरूणी शिर्डीत मागतेय भीक - SHIRDI NEWS

शिर्डीमध्ये भिक्षेकरी पकडण्याची मोहीम राबवण्यात आली. पोलीस, साईसंस्थान आणि नगरपरिषदेनं कारवाई करत ७२ भिक्षेकऱ्यांना पकडलं. भीक मागताना मुंबईचे निवृत्त पोलीस अधिकारी, उच्चशिक्षित तरूणीला पोलिसांनी पकडलं.

SHIRDI NEWS
शिर्डीतील भिक्षेकरी (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2025, 7:54 PM IST

शिर्डी : शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत आणि साईबाबा संस्थान भिकारी हटाव मोहीम राबवत आहेत. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी आणि भाविकांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध तसंच भाविकांना त्रास देणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर धडक कारवाई करत सुमारे 72 भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यात सोळा जिल्ह्यातील आणि पाच राज्यातील भिक्षेकऱ्यांचा समावेश आहे. काल (दि. २०) सकाळ पासूनच ही मोहीम राबवण्यात आली. यातील महिला भिक्षेकरींची मुंबईतील चेंबूर इथं रवानगी करण्यात आली. तर, पुरुष भिक्षेकरींना विसापूर इथं पाठवण्यात आलं आहे. या कारवाई दरम्यान मुंबईचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक उच्चशिक्षित तरुण भीक मागत असल्याचं समोर आलं आहे.

मोहिमेत आली धक्कादायक माहिती समोर : पोलिसांनी केलेल्या भिकारी धरपकड मोहीमेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस मधील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक हे भीक मागताना आढळले. ते गेल्या दहा वर्षापासून शिर्डीत वास्तव्यास आहेत. पहिल्यांदा त्यांनी वर्तमानपत्र विकायचं काम केलं. मात्र, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ते भीक मागत असल्याची माहिती समोर आली आहे. अलिकडंच त्यांचं मुंबईतील जुनं घर विकल्यामुळं त्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची माहिती समोर आली. काल त्यांना भीक मागताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर त्यांची चौकशी करताना ते सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याची माहिती समोर आली. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता, व्यसनाधीन झाल्यामुळं त्यांनी नोकरी सोडल्याचं समोर आलं. यानंतर त्यांना विसापूर इथं पाठवण्यात आलं आहे. शिर्डीत वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबावर अग्नि दुर्घटनेमुळं मोठं कर्ज झालं. नातेवाईकांकडून हातउसणे घेतलेले पैसे परत करण्यासाठी आई, पत्नी आणि लहान मुलगी भीक मागत असल्याचं आढळलं. चेहरा आणि शरीरवर जखमा असल्यानं त्यांना कोणी काम देत नाही. परिणामी कर्ज फेडण्यासाठी ते भीक मागतात.

प्रतिक्रिया देताना शिरीष वमने आणि स्थानिक नागरिक (ETV Bharat Reporter)

विदेशी पर्यटकांसोबत इंग्रजीत संभाषण करत मागतात भीक :शिर्डीमध्ये देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. इथं आलेल्या परदेशी भाविकांसोबत इंग्रजीत संभाषण करून भीक मागताना काहीजण आढळून आलेत. ते भाविकांना शिर्डीची माहिती इंग्रजीमध्ये देऊन त्यांच्याकडून पैसे घेतात. अशा कामातून पैसे मिळवून ते व्यसनाधीन झाले आहेत. यामुळं पोलीस ही मोहीम अधिक तीव्र करणार आहेत. मोहीमेत सापडलेल्या सर्व भिकाऱ्यांची नावनोंदणी करत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसंच न्यायालयाच्या आदेशानं पुरुषांना विसापूर तर, महिलांची चेंबुर इथल्या भिक्षेकरी गृहात रवानगी केली आहे.

हेही वाचा :

  1. शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात निसर्ग सौंदर्याची अनोखी रंगत, सातशेहून अधिक रोपांची केली लागवड
  2. शिर्डीत ५०० रुपयांचे पूजा साहित्य ४ हजारांना विकले, साईभक्ताची फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल
  3. शिर्डी साईबाबा मंदिराच्या कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा

ABOUT THE AUTHOR

...view details