मुंबई Objection on Z Plus security : केंद्रीय गृहमंत्र्यांकडून शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार यांना असलेला धोका लक्षात घेता त्यांनाही सुरक्षा देण्यात येत असल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात शरद पवार यांना 15 ऑगस्ट रोजी पत्र पाठवण्यात आलं होतं, तर शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांची बैठक झाली. या बैठकीला सीआरपीएफ चे महासंचालक कमलेश सिंह, गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन दल तसंच इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी उपस्थित होते. शरद पवार यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. ती वाढवून त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याबाबत या बैठकीत माहिती देण्यात आली. शरद पवारांना असलेल्या धोक्यामुळे ही सुरक्षा वाढवली असल्याचं केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केलं. हा निर्णय का घेण्यात आला याची माहिती शरद पवार यांना देण्यात आली. तसंच पवार यांच्या निवासस्थानाच्या भितींची उंची वाढवण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. एकूणच पवार यांना गंभीर धोका असल्याचं चित्र या बैठकीत मांडण्यात आलं.
म्हणून पवारांनी नाकारली सुरक्षा - झेड प्लस सुरक्षेनुसार शरद पवार यांच्या भोवती रात्रंदिवस 50 जवानांचा गराडा असणार आहे. त्यांना घरामध्ये आणि घराबाहेर सुरक्षा देण्यात येणार आहे. त्यांनी स्वतःचे वाहन न वापरता सीआरपीएफच्या वाहनाचा वापर करावा आणि या वाहनात दोन सुरक्षारक्षक कायम तैनात असतील असं प्रस्तावित आहे. मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचानक ही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून याच्यामध्ये आपल्या जीविताच्या धोक्याचे कारण जरी दिले जात असले तरी आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी ही यंत्रणा कामाला लावली आहे का? अशी शक्यता पवारांनी बोलून दाखवली आहे. त्यांनी आपल्या घरामध्ये आणि आपल्या वाहनांमध्ये सुरक्षा रक्षक नकोत असे थेट सांगितलं आहे. तसंच सीआरपीएफच्या वाहनाचाही वापर करण्यास नकार दिला आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे आपल्यावर पाळत ठेवून आपली सगळी माहिती मिळवण्याचा हा एक वेगळा प्रयत्न असल्याचं पवारांचं म्हणणं आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, "पवार साहेबांनी विचारपूर्वकच काही विचार मांडला असेल, जर अशा पद्धतीने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कोणी पाळत ठेवत असेल तर एक प्रकारे सुरक्षा पुरवून त्यांना नजर कैदच करण्याचा प्रयत्न आहे की काय, अशी शंका उपस्थित होते." मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पवार साहेबच घेतील, असंही ते म्हणाले.
हा राजकीय निर्णय नसावा-अशोक चव्हाण - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की, हा केंद्र सरकारच्या यंत्रणांनी घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय घेताना त्यांनी काही बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला असावा. त्यामुळे या निर्णयात काही राजकीय हस्तक्षेप असावा असं प्रथम दर्शनी वाटत नाही. आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा स्वीकारायची की नाही, हा निर्णय सर्वस्वी शरद पवार यांचा आहे. मात्र यात काही राजकीय हेतू असेल असं आता तरी वाटत नाही, असं चव्हाण यांचं म्हणणं आहे.