लोणावळा(पुणे) Sharad Pawar : शरद पवार गटानं लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी शरद पवार यांनी मावळमधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसंच मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या दमदाटीवरुनही पवार यांनी इशारा दिलाय.
शरद पवारांचं जंगी स्वागत :लोणावळ्यात पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी तुतारी वाजवून व क्रेनच्या सहाय्यानं हार घालून शरद पवार यांचं जंगी स्वागत केलं. तसेच जेसीबीद्वारे त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. दरम्यान, अजित पवार गटातील लोणावळ्यातील १०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय.
केंद्र आणि राज्य सरकारवर टीका :शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. शरद पवार म्हणाले, "देशात भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होतोय. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं. आता ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. केजरीवाल गेल्या १० वर्षांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता क्राईम ब्रँचनं आठवं समन्स धाडलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक करण्याची भाजपाची योजना आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्यानंतर भाजपाची आता दिल्लीवर नजर आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनिल देशमुखांना सहा महिने तुरुंगात डांबून ठेवलं होतं. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही चार महिने तुरुंगात अडकवलं होतं. कारण राऊत हे 'सामना'तून भाजपावर टीका करतात. म्हणजे या देशात बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही."
सुनील शेळकेंची दमदाटी? : शरद पवार पुढं म्हणाले, "मी इथं आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की, इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदारानं (मावळचे आमदार सुनील शेळके) बैठकीला तुम्ही येताय म्हणून तुम्हाला दमदाटी केली. कोणीतरी त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांनी त्या टीकाकारांनाही फोन करून दम दिला. हा काय प्रकार आहे? कोणी चूक केली तर त्यांच्यावर टीका करायची नाही का? लोकशाहीत जाहीर बोलायचं नाही का? कोणी बोललं तर दमदाटी होते."