नाशिक Shantigiri Maharaj Contest Loksabha : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक संत, महंत निवडणूक रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. बाबाजी भक्त परिवाराचे शांतीगिरी महाराज देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक अशा दोन पैकी एका मतदारसंघातून ते लढणार आहेत. तरी त्यांनी निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वेळ मागितल्यानं वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय.
राज ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली : नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा करत श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यामुळे यंदा नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणाऱ्या संत महंतांचा कल भाजपाकडे असल्याचं दिसतंय. मात्र, अशात शांतीगिरी महाराज यांनी मनसेकडं कल दाखवल्याचं जाणवतंय. मनसेनं नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप उमेदवारी निश्चित नाही. "तुम्ही तयारी करा मी उमेदवारीचं बघून घेईन", असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. अशात आता शांतीगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
शांतीगिरी महाराजांची ओळख : जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतलाय. देशभक्ती आणि राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी महाराज निवडणूक लढवणार असल्याचं भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सांगितलं. नाशिक मतदारसंघात जय बाबाजी परिवाराची संख्या तीन लाखाहून अधिक आहे. शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत. लाखोंच्या संख्येनं त्यांचा भक्त परिवार आहे. प्रवचन, भजन, अनुष्ठान, सत्संगच्या माध्यमातून ते धार्मिक कार्यात पुढाकार घेतात. देशभरात त्यांचे 115 आश्रम आहेत. 7 गुरुकुल देखील ते चालवितात. अनुष्ठानच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांची मौनीगिरी महाराज अशीही ओळख आहे. याआधी त्यांनी तब्बल 12 वर्ष मौन पाळले होते. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये बाबाजी परिवारानं मोठा सत्संगचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात राज्यभरातून लाखो भक्त सहभागी झाले होते. तसेच अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.