चंद्रपूर :विधानसभा निवडणूक 2024 चा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आला असून सर्वत्र राष्ट्रीय नेत्यांचे प्रचार दौरे सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात देखील भाजपा आणि काँग्रेसचे नेते प्रचारासाठी येत आहेत. यापैकी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात प्रचारासाठी भाजपाचे अनेक मोठे नेते आलेत, मात्र काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि स्टार प्रचारकांनी याकडं सपशेल पाठ फिरवल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे येथील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांना स्वतःच्या बळावरच प्रचार करण्याची वेळ आली आहे.
काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराकडं नेत्यांनी फिरवली पाठ :चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत भाजपा उमेदवारांच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रवी किशन या मातब्बर नेत्यांनी हजेरी लावली. तर काँग्रेस पक्षाकडून सचिन पायलट, कन्हैया कुमार हे चंद्रपूर जिल्ह्यात आले. चंद्रपूर विधानसभेचे भाजपाचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी सभा घेतल्या. मात्र काँगेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचा एकही नेता फिरकला नाही. सचिन पायलट यांनी वरोरा-भद्रावती विधानसभेचे उमेदवार प्रवीण काकडे यांच्यासाठी प्रचारसभा आटोपल्यावर राजुरा येथील काँग्रेस उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या प्रचारासाठी थेट राजुरा गाठलं. भद्रावती येथून राजुरा जाण्यासाठी चंद्रपूरमार्गेच जावे लागते, मात्र इथे त्यांनी कुठलीही सभा घेतली नाही. काँग्रेसचे प्रवक्ते कन्हैय्या कुमार हे देखील बल्लारपूर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंग रावत यांच्या प्रचाराला आले, मात्र चंद्रपूर येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली नाही. चंद्रपूर येथील भाजपाचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचाराला 15 नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. तर 16 तारखेला राहुल गांधी यांची चिमूर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर येथे भाजपाचे अनेक दिग्गज नेते प्रचाराला येत असताना काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्यानं येथे सभा न घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांना आपल्या प्रचारासाठी एकांगी खिंड लढवावी लागत आहे.