मुंबईSeat sharing of Mahavikas Aghadi:आमदार विश्वजीत कदम हे सांगलीच्या जागेवर अडून आहेत. त्यांनी ही जागा मिळवणारच असं सांगितलं आहे. तर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मात्र जागावाटप लवकरच जाहीर होईल, असं सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरात शनिवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात ही निवडणूक 5 टप्प्यात घेतली जाणार आहे. उमेदवारी अर्ज लवकरच दाखल केले जाणार आहेत; मात्र तत्पूर्वी राज्यातील महाविकास आघाडी जागा वाटपाबाबत अद्याप अडचणी कायम आहेत. येत्या एक दोन दिवसात जागावाटप यादी जाहीर होईल, असं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात काही जागांबाबत नव्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत.
काय ठरले आहे जागा वाटपाचे सूत्र -लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections)महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं सूत्र जवळपास निश्चित झालं आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 22 जागा काँग्रेसला 16 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा देण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सामील करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीलाही चार जागा सोडण्याचा विचार महाविकास आघाडीने केला आहे; मात्र या जागा कोणत्या याबाबत अद्याप निश्चिती झाल्याचं दिसत नाही.
कोणत्या पक्षाकडे जाणार कोणत्या जागा :महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडे नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली, रामटेक, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे कोल्हापूर आणि उत्तर मध्य मुंबई या जागा जाण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे रायगड, ठाणे, नाशिक, पालघर, कल्याण, रत्नागिरी, जळगाव, मावळ, शिर्डी, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, बुलडाणा, हातकणंगले, यवतमाळ, दक्षिण मुंबई, सांगली, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर ईशान्य मुंबई आणि मुंबई उत्तर पश्चिम या जागा जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे दिंडोरी, शिरूर, बारामती बीड, रावेर, माढा, अहमदनगर, सातारा, भिवंडी, वर्धा या जागा जाण्याची शक्यता आहे.