अमरावती Larvae Found In Millets Chocolate : मेळघाटातील गडगाभांडुप गावातील जिल्हा परिषद शाळेत (Zilla Parishad School) विद्यार्थ्यांसाठी आलेल्या मिलेट्स चॉकलेटमध्ये (Millets Chocolate) अळ्या (larvae) आढळून आल्यानं खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संदर्भात शाळेत येऊन तक्रार केली असून, हा प्रकार आमच्या पाल्यांच्या आरोग्याशी खेळणारा असल्याचा रोष देखील पालकांनी व्यक्त केला.
असा आहे प्रकार? : मेळघाटातील विद्यार्थ्यांमध्ये शाळा आणि अभ्यासाबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी शासनाच्या वतीनं शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. याचाच एक भाग म्हणून मुलांना मिलेट्स चॉकलेट देखील दिले जाते. चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गडगाभांडुप येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मिलेट्स चॉकलेट वाटण्यात आले. विद्यार्थ्यांनी हे चॉकलेट आपल्या घरी नेले असताना चॉकलेटवरील कवर उघडताच त्यातील चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्या. हा प्रकार पाहताच पालकांनी थेट शाळेत धाव घेतली. शाळेतील शिक्षकांना या संदर्भात माहिती देण्यात आली. शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मिलेट चॉकलेट पुरवणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी देखील पालकांनी केली.