सिंधुदुर्ग :शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत फसवणूक करणारा माणूस आहे, अशी टीका भाजपा नेते नारायण राणे यांनी केली आहे. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नारायण राणेंनी पलटवार केलाय. लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेत राहणार नाहीत, असा सनसनाटी दावाही नारायण राणे यांनी केलाय. संजय राऊत हे जामीनावर बाहेर आहेत. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवली, अशी घणाघाती टीकाही राणेंनी यावेळी केली. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना संपवण्यासाठी राऊतांचे युक्तिवाद सुरू आहेत, असा टोला राणेंनी यावेळी लगावलाय. (Shiv Sena Thackeray group) संजय राऊत यांना फारसं महत्त्व देऊ नये, असंही यावेळी नारायण राणेंनी म्हटलं आहे.
कोणत्या जेलमध्ये जायचं आहे ते आधी ठरवावं : नारायण राणे यांनी, संजय राऊत लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहणार नाहीत. त्यांच्या गाठीभेटी सुरुयेत? कोणाशी बोलणं होतयं हे शोधलं पाहिजे. शिवसेनेचे पाच खासदार आहेत, मग दोन महिन्यात शिवसेनेचं सरकार कसं येईल हे कोणी सांगू शकेल का, असा टोला त्यांनी लगावला आहे. तिहार जेलमध्ये जायला गुन्हा करावा लागतो. मी कोणताही गुन्हा केला नाही, तेवढी काळजी घेतो. संजय राऊतवर अनेक केसेस सुरू आहेत. ते एक नंबरचे भ्रष्टाचारी आहेत. तसंच, ते जामीनावर बाहेर आहेत. त्यांना कोणत्या जेलमध्ये जायचं आहे ते आधी ठरवावं, असं प्रत्युत्तर राणेंनी दिलं आहे.
राऊतांचा पलटवार : नारायण राणे यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर दोन महिन्यात ते तिहार जेलमध्ये जातील, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावरून आता नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात चांगलीच जुंपली आहे. संजय राऊत यांच्या आरोपांचा समाचार घेताना नारायण राणे यांनी, लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊतचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहणार नाहीत. तसंच ते जामिनावर बाहेर आहेत, येणाऱ्या काळात त्यांनी कोणत्या जेलमध्ये जायचंय ठरवावं, असा टोला लगावला आहे.
नितेश राणेंचा इशारा :मुंगेरीलाल के हसीन सपने पाहणाऱ्या संजय राऊत यांनी नारायण राणे यांची आणि भाजपाच्या नेत्यांनी चिंता करू नये. 2024 ला एनडीएचं सरकार येतय. पोलीस तुमची वाट पाहात आहेत. याची काळजी करा आणि मगच नारायण राणे आणि भाजपाच्या नेत्यांवर बोलण्याची हिंमत करा, असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी दिला आहे.