मुंबई :शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सातत्यानं टीका करत असतात. महाराष्ट्रात गुंडांचं राज्य सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 5 फेब्रुवारीला राऊतांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा गुंड हेमंत दाभेकरबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता येथून पुढे, रोज एक फोटो ट्वीट करणार, अशी धमकी त्यांनी दिली होती.
मुख्यमंत्र्यांचा गुंडाबरोबरचा फोटो शेअर : संजय राऊतांनी आज, 10 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये मुख्यमंत्री एका व्यक्तीबरोबर सेल्फी घेताना दिसतायेत. संजय राऊतांनी दावा केला आहे की, ही व्यक्ती नाशिक मधील गुंड 'वेंकट मोरे' असून तिच्यावर हत्या, अपहरण, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्देशून हे ट्विट केलंय. संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्र भाजपालाही टॅग केलंय.