मुंबई Sanjay Raut Demands SIT: मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची हानी झाल्या प्रकरणी महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला. आज महाविकास आघाडीच्या वतीनं या प्रकरणी आंदोलन करण्यात येणार आहे. दुसरीकडं उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रकरणी न्यायाधीशांच्या मार्फत एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. संजय राऊतांनी छत्रपती शिवाज महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. पुतळा प्रकरणाचं ठाणे कनेक्शन असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
पुतळ्याचं ठाणे कनेक्शन :"आता सरकार आणि सरकारमधील मंत्री सांगताहेत की, पुतळा वाऱ्याच्या वेगानं पडला. पण तिथं आजूबाजूला नारळाची झाडं आहेत, घरं आहेत. त्या वाऱ्यानं ती घरं किंवा ती नारळीची झाडं पडली नाहीत. फक्त पुतळाच कसा काय पडला? याचा अर्थ पुतळ्याचं निकृष्ट दर्जाचं काम केलं होतं. यात जलदगतीनं काम केलं म्हणजे यात कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाला आहे. या पुतळ्याचं ठाणे कनेक्शन आहे," असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे पुत्र यांचाही यात संबंध आहे. अशा बातम्या समोर येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं तुम्ही कोट्यवधी रुपयाचा घोटाळा करणार आणि त्याच पैशातून तुम्ही महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार. हे बघून आम्ही फक्त निषेध करायचा... शांत बसायचं का?," असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
एसआयटी चौकशी झाली पाहिजे :"आज महाविकास आघाडीचा मालवणमध्ये निषेध मोर्चा आम्ही काढतोय. पण हे आंदोलन संपणार नाही. मी स्वतः परवा मालवणमध्ये जात आहेत. तिथं आम्ही आंदोलन करणार आहे. राज्यभरातून तिथं लोकं येतात. लोकांमध्ये संतापाची लाट आहे. आणि याच्या चौकशीसाठी न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली SIT ची स्थापना झाली पाहिजे," अशी मागणी संजय राऊतांनी केली. दरम्यान, मंत्री दीपक केसकर यांनी हा अपघात होता. काही चांगलं होण्यासाठी एक दुर्घटना घडली, असं म्हटले आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "मंत्री दीपक केसरकरांना XXXनं मारलं पाहिजे. सडक्या विचाराची माणसं महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं म्हणताहेत. यांच्या डोक्यातून हे विचार कसे येऊ शकतात. हे देवेंद्र फडणवीस यांचं पाप आहे. अशी लोकं आणि ही टोळी पोसण्याचं काम नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे या सर्वांला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत," असं राऊत म्हणाले. त्यामुळे "या सर्व लोकांनी पैसे खाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला," असा आरोप नाही सत्य आहे असं राऊत म्हणाले.