महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरएसएस सारख्या शत्रूच्या व्यासपीठावर जाताना लाज कशी वाटत नाही? 'विद्रोही'च्या पार्थ पोळकेंची सडकून टीका - SATARA NEWS

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड शाखेनं घेतलेल्या बंधुता परिषदेत दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पुरोगामी नेत्यांवर टीका केली होती. त्याला समता परिषदेत प्रत्युत्तर दिलंय.

Satara News
समता परिषद (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2025, 9:09 PM IST

सातारा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळात काँग्रेसला शत्रू मानत होते. परंतु, आताच्या काळातला शत्रू काँग्रेसपेक्षा भयानक आहे. हा पारंपरिक शत्रू मोठ्या ताकदीनं उभा राहिला आहे. स्वतःला बुध्दीवादी, प्राध्यापक म्हणवून घेतात, त्यांना आरएसएसच्या व्यासपीठावर जाताना लाज कशी वाटत नाही? असा सवाल करत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळकेंनी दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्यावर सडकून टीका केली.



बाबासाहेब जयंती पुरतेच आहेत का? :कराडमधील समता सामाजिक विकास संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी आणि आंबेडकरवादी संस्था, संघटनांच्यावतीनं आयोजित समता परिषदेत पार्थ पोळके बोलत होते. ते पुढं म्हणाले, "जयंतीला पताका लावणं, बँडबाजा, डॉल्बी लावण्यापुरतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत का? बाबासाहेबांनी संपूर्ण हयात ज्या प्रवृत्तींच्या विरोधात उभी केली, त्यांच्या विरोधात लढायची आता खरी गरज आहे. कारण, हा अतिशय वाईट काळ आहे".

समता परिषदेत बोलताना पार्थ पोळके (ETV Bharat Reporter)


'आरएसएस' हा घातकी विचार : बाबासाहेबांनी त्या काळात ज्या घोषणा केल्या, त्या तत्कालिन परिस्थितीला अनुसरून होत्या. आजच्या काळाची भूमिका वेगळी आहे. त्या काळात बाबासाहेबांनी काँग्रेस, गांधींवर टीका केली. परंतु, त्यांच्यावर टीका करायची आज तुम्हाला गरज नाही. कारण, तुमचा खरा शत्रू आरएसएस, सावरकर, गोळवलकर, हेडगेवार हे आहेत. आरएसएस हा घातकी विचाराचा आहे. जी माणसं बाबासाहेबांना आयुष्यभर शिव्या देत होती. घटना परकीय मानणारी माणसं बाबासाहेब कराडमध्ये आल्याचा दिवस साजरा करतात. ही नौटंकी आम्हाला कळते, असा टोलाही पार्थ पोळकेंनी लगावला.



फुले, आंबेडकरांचा खोटा इतिहास सांगू नका : पार्थ पोळके पुढं म्हणाले, "डॉ. बाबासाहेब, ज्योतीबा फुले आणि सावित्रीमाईंनी बारा स्वर आणि छत्तीस व्यंजनं आमच्या ओट्यात टाकली. त्याचा अन्वयार्थ, त्याची इज्जत, किंमत आम्हाला कळते. त्यामुळं खोटा इतिहास तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. आम्हीच तुमचा इतिहास पडताळून पाहायला लागलो आहोत. सहा शास्त्रं आणि अठरा पुराणं, हे सगळं आम्ही कोळून प्यायला लागलोय. जे ग्रंथ आम्हाला बघूच दिले नाहीत. अभ्यासच करू दिला नाही, ते ग्रंथ आमचे कसे होतील? हे लक्षात ठेवून तुम्हाला यापुढची लढाई लढावी लागेल, असं पार्थ पोळके यांनी सांगितलं.



प्राध्यापक, डॉक्टर आरएसएसमुळे झाला का?: डॉ. बाबासाहेबांनी त्या काळात काँग्रेसला शिव्या दिल्या, पण आज काय चित्र आहे. काँग्रेसनं शाळा काढल्या. आपण प्राध्यापक, वकील, डॉक्टर झालो. ते भाजपा आणि आरएसएसमुळं झालो का? कराडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण साहेबांनी सवलत दिली. त्यानंतर हजारो पोलीस, तलाठी, मास्तर, ग्रामसवेक झाले. ही काँग्रेसची देण आहे. त्यांनी जे दिलंय ते मोठ्या मनाने स्वीकारा, असं आवाहनही पार्थ पोळके यांनी आंबेडकरवाद्यांना केलं.


आमची लढाई आरएसएसवाल्यांच्या विरोधात: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना आरएसएसवाल्यांनी जाळली, असा थेट आरोप पार्थ पोळके यांनी केला. तेच लोक डॉ. बाबासाहेब इथे (कराडला) आले होते म्हणून सांगतात. आमची लढाई गांधी, काँग्रेस किंवा हिंदूंच्या विरुध्द नाही. आमची लढाई ही आरएसएसवाल्यांच्या विरुध्द आहे, असंही पोळके यांनी ठणकावलं.

हेही वाचा -

  1. दलित-ब्राम्हणच जातीयवादाचे खरे बळी, आरएसएसच्या कार्यक्रमात प्रा. मच्छिंद्र सकटेंचं वक्तव्य, आंबेडकरवाद्यांची तीव्र प्रतिक्रिया
  2. "समज नसल्यामुळं धर्माच्या नावाखाली छळ", मोहन भागवत असं का म्हणाले?
  3. राम मंदिर निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही- मोहन भागवत

ABOUT THE AUTHOR

...view details