पुणेSambhaji Bhide :शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. पुण्यात पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी "आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हांडगं, दळभद्री स्वातंत्र्य आहे" असं वक्तव्य केलंय. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. संत तुकाराम महाराज तसंच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पुणे शहरात आगमन झालं. दरवर्षी या पालखी सोहळ्यात संभाजी भिडे असंख्य कार्यकर्त्यांसह सहभागी होतात. याच पार्श्वभूमीवर संभाजी भिडे पुण्यात आले. त्यानंतर संभाजी भिडे यांनी स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.
भिडेंना पुणे पोलिसांची नोटीस : जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज तसंच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या बरोबर धारकरी पालखीत सहभागी होतात. याआधी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. यावेळी शिवप्रतिष्ठाण अध्यक्ष संभाजी भिडे यांना आषाढी वारीत सहभागी होण्यावर निर्बंध नसले, तरी त्यांना पुणे पोलिसांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी नोटीस दिली आहे. पालखी दर्शनावेळी कायदा-सुव्यवस्थेची काळजी घ्यावी, अशी सूचना भिडे यांना देण्यात आली.