ठाणे :गेल्या काही वर्षांत महागाईमुळं गायीसह म्हशीच्या दुधाला चांगला भाव मिळत आहे. शहरात 80 ते 90 रुपये प्रतिलिटर दरानं दूध विकलं जात आहे. याचाच फायदा घेत गाई-म्हशींच्या दूध वाढीसाठी बनावट इंजेक्शन आणि औषधांचा वापर होत आहे. अशाच बनावट इंजेक्शन, औषधांच्या साठ्यावर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकलाय. त्यामुळं परिसरात चांगलीच खळबळ उडालीय.
4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल : खळबळजनक बाब म्हणजे भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील कारखान्यात बनावट इंजेक्शन आणि औषधे तयार करण्यात येत होती. या बनावट औषधांचा भिवंडीतील रोशन बाग येथील फैजान कंपाऊंडमध्ये विकण्याचा कट 4 जणांनी रचला होता. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान शकील थोटे (28), साकिब मोहत्तसिम वर्दी (28), शोएब कमालउद्दीन अन्सारी (45), असफी रफिक थोटे (43) अशी आरोपींची नावं आहेत. या गुन्ह्यात कारखाना मालक झिशान शाहनवाज बर्डी (रा. बापगाव, भिवंडी) याचाही सहभाग असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय.
बनावट इंजेक्शनची विक्री : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 5 महिन्यांपासून पाचही आरोपी आर्थिक फायद्यासाठी बनावट औषध निर्माण करत होते. तसंच ते अवैधरित्या गाई-म्हशींना जादा दूध देण्यासाठी देणारं बनावट इंजेक्शनची विक्री करत होते. भिवंडी शहरातील रोशनबाग येथील फैजान कंपाऊंडमध्ये कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्यांनी हा धंदा सुरू केला होता. विशेष म्हणजे या सर्व बेकायदेशीर धंद्यामुळं जनावरांच्या आरोग्यासह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी ठाणे अन्न, औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सहाय्यक आयुक्त (कोकण विभाग) राजेश बाबुराव बनकर यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय सौंदर्य प्रसाधनं कायदा 1940 चं कलम 18 (सी) अन्वये 4 जणांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
12 लाख 40 हजारांचा मद्देमाल जप्त :आरोपीच्या कारखान्यातून 200 लिटर रासायनिक मिश्रणाचे तयार इंजेक्शन, 2 ड्रम, कागदी पुठ्ठ्याचे 17 बॉक्स, द्रव मिश्रणाच्या 195 प्लास्टिकच्या बाटल्या, 5 लिटर कार्बोलिक क्रिस्टल केमिकलची 1 कॅन, 35 लिटर क्षमतेचा आणखी एक 1 कॅन जप्त करण्यात आलाय. तसंच 200 लिटरचे 2 ड्रम, 35 लिटर निळ्या रंगाची ऍसिडिक ऍसिडची 1 कॅन, एक गोणी, 95 मिलीच्या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांची एक बॅग, 12 लाख 40 हजारांचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. भिवंडी गुन्हे शाखा युनिट-2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राज माळी यांनी सागितलं की, "चारही आरोपींना अटक करून सीआरपीसी 41 (1) (अ) नुसार नोटीस बजावून सोडून देण्यात आलंय. फरार कारखानदाराचा शोध सुरू आहे."