मुंबई-अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चाकूनं मारहाण करणाऱ्या बांगलादेशी आरोपींबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा इलेक्ट्रॉनिक्सि मीडियामधील बातम्यांच्या आधारे पोलिसांच्या तपासावर बारकाईनं लक्ष ठेवून होता. मीडियानं दाखवलेल्या संशयिताचे स्क्रीनशॉट काढून त्यानं मोबाईल फोनमध्ये ठेवले होते.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी अटक होत नसल्यानं पोलिसांवर दबाव वाढला होता. पोलिसांनी आरोपीला पकडण्याकरिता सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास सुरू केला होता. या संशयितांचे फोटो माध्यमांकडून दाखविण्यात आले होते. या आरोपीनं संशयितांचे बातम्यांमधील स्क्रीनशॉट काढले होते. विशेष म्हणजे संशयितांचे फोटो बऱ्याच प्रमाणात आरोपीशी जुळणारे होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी यापूर्वी दोन संशयितांना उचलून त्यांची चौकशी केली होती.
अभिनेत्याच्या घरात कसा शिरला?मुंबई पोलिसांमधील सूत्राच्या माहितीनुसार सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी गुन्ह्याचं नाट्यरुपांतरण (सीन रिक्रिएशन) करण्यात येणार आहे. शहजादला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांनी ठाणे शहरातून अटक केली. न्यायालयानं आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांमधील तपासानुसार आरोपी हा इमारतीच्या सातव्या-आठव्या मजल्यावरील पायऱ्या चढला होता. त्यानं डक्ट एरियामधून शिरत पाईपचा वापर करून १२ व्या मजल्यावर पोहोचला. बाथरुमच्या खिडकीतून अभिनेत्याच्या फ्लॅटमध्ये शिरला होता. आरोपीनं घरात शिरल्यानंतर ५४ वर्षीय अभिनेता सैफअली खानवर चाकुचे ६ वार केले होते. अभिनेत्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून काही दिवसांमध्ये डिस्चार्ज दिला जाणार आहे.