मुंबई :बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शहजाद या आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपीची पोलीस कोठडी शुक्रवारी संपत असल्यानं पोलिसांनी त्याला मुंबईतील वांद्रे न्यायालयासमोर हजर केलं. त्यावेळी न्यायालयानं पोलीस कोठडी वाढवून हवी का, असा प्रश्न विचारला. त्यावेळी पोलिसांतर्फे पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली.
या आरोपीचे गुन्हा घडला तेव्हा वापरलेले कपडे, गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. मात्र, गुन्ह्यात वापरलेले बूट मिळालेले नाहीत, त्याचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची मुदत अजून सात दिवस वाढवून द्यावी, अशी मागणी वकिलांनी केली. हा गंभीर गुन्हा आहे. अद्याप या गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू जमा करायच्या आहेत. तसंच अजूनही या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे. सिमकार्ड नेमकी कोणाची आहेत, याबाबत आरोपी उडवा उडवीची उत्तरे देत आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीचा चेहरा हे देखील तपासायचं आहे. त्यामुळे आरोपीची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी वकिलांनी केली.
तर, आरोपीची पोलीस कोठडी वाढू नये, अशी मागणी आरोपीच्या वकीलांतर्फे करण्यात आली. सदर घटना घडली तेव्हा आरोपीनं कोणतीच आरडा ओरड केली नाही. त्यानंतर थेट जखमी अवस्थेतील सैफ अली खानला ऑटो रिक्षातून नेण्यात आलं. आरोपीला पुन्हा पोलीस कोठडी देण्याची कोणतीही गरज भासत नाही. त्याचे कपडे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळ पोलीस कोठडी देऊ नये, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली.