पुणे Rohit Pawar On Cm Candidate : गेल्या एक महिन्यापासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, याबाबत चर्चा होत आहे. याबाबत अनेक नेते मंडळी यांनी वक्तव्य केलं असलं, तरी आता देखील याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले की "ही चर्चा निवडणूक जाहीर होण्यापर्यंत राहणार आहे, पण जेव्हा निवडणूक जाहीर होणार तेव्हा कुठंही हा वाद किंवा चर्चा राहणार नाही. सर्वजण एकनिष्ठेनं महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते एकत्र येतील. निवडणुकीच्या नंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटते," असं यावेळी रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, असा आग्रह धरल्यानं हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारला संविधानाचं काहीही वाटत नाही :आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. "पदाचा वाद आज नको, आज काय महत्वाचं आहे, तर शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी यांच्यासाठी लढण्याची गोष्ट आहे. मला नागरिक म्हणून भीती वाटू लागली आहे, की सरकारला संविधानाचं काहीही वाटत नाही. राज्याची निवडणूक ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होती, मात्र आता नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील, असं वाटत आहे. संविधानाला धरून निवडणुका व्हायला हव्या होत्या. भाजपा आणि महायुतीचा इंटरनल सर्वे त्यांच्या बाजुनं नाही, तर विरोधात आहे. त्यामुळे निवडणुका पुढं गेल्या आहेत. हा संविधानाला फार मोठा धोका आहे. मुख्यमंत्री पदाच्या बाबत माविआमध्ये चर्चा होते, ते ही उघड उघड चर्चा होते. तशी महायुतीमध्ये चर्चा तर होतच नाही. कोणी म्हणतं का फडणवीस मुख्यमंत्री होतील किंवा अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढणार आहे," असं रोहित पवार म्हणाले.
आयोगानं दोन मागण्या मान्य केल्या :"विद्यार्थी स्वतः च्या हक्कासाठी आंदोलन करत होते. आयोगानं दोन मागण्या मान्य केल्या आहेत. मी काल पोलिसांना सांगितलं की, दबावतंत्र वापरून विद्यार्थ्यांचे हक्क हिरावून घेऊ नका. आज शरद पवार यांनी लक्ष घालून आयोगाच्या अध्यक्षांशी बोलले. दोन प्रमुख मागण्या होत्या, त्यासाठी शरद पवार पुढं आले आणि त्यांनी ट्विट पण केलेलं होतं. कृषी जागेबाबत स्पष्टीकरण आलं नाही, त्याही लवकर अॅड कराव्या, आशी मागणी होती. हा महिना संपण्याअगोदर मुलांचे प्रश्न मार्गी लावल्या जातील. याबाबत मुख्यमंत्री लवकरच वेळ देतील," असं यावेळी रोहित पवार म्हणाले.