मुंबईmilk producing farmers : - राज्यातील सहकारी दूध संघ आणि खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रतिलिटर ५ रुपये अनुदानात १ ऑक्टोबरपासून २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय सरकारने आज जारी केला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दूध भुकटी आणि बटरचे दर कोसळल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव देण्याच्या हेतूने सरकारतर्फे मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार सरकारने निर्णय घेतला असून, आता सहकारी दूध संघ आणि खासगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.५ फॅट /८.५ एसएनएफ या गुणप्रतिकरिता किमान २८ रुपये प्रतिलिटर इतका दर १ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार :विशेष म्हणजे शेतकऱ्यांना शासनामार्फत ७ रुपये प्रतिलिटर बँक खात्यांवर थेट वर्ग करण्यात येणार आहेत. फॅट आणि एसएनएफ ३.५ फॅट/८.५ या गुणप्रतिपेक्षा प्रति बिंदू कमी होणाऱ्या फॅट आणि एसएनएफकरिता प्रत्येकी ३० पैसे वजावट करता येणार आहे. तसेच प्रति पॉइंट ३० पैसे वाढ करण्यात येईल, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता संगणक प्रणालीद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे थेट वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर या योजनेचा आढावा घेऊन योजनेस पुढील कालावधीकरिता मुदतवाढ देण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. १२ जुलैनुसार घोषित केलेल्या दूध भुकटी निर्यातीस ३० रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान आणि दूध भुकटी रूपांतरणास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे अनुदान ३० सप्टेंबरपर्यंतच देय राहणार आहे. तदनंतर सदर योजना सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. शासन निर्णयान्वये घोषित दूध भुकटी रूपांतरणासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रतिलिटर दीड रुपये अनुदान हे प्रतिदिन ६० लाख लिटर मर्यादेऐवजी प्रतिदिन ९० लाख लिटर मर्यादेपर्यंत दुधास लागू करण्यात येत आहे. त्यानुसार दूध भुकटी रूपांतरणासाठी ७९ कोटी २० लाख इतक्या अतिरिक्त निधीस मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचाः
- आगामी विधानसभा निवडणूक 2024 फक्त देवेंद्र फडणवीस नव्हे, तर 'या' नेत्यांच्या नेतृत्वात लढवणार भाजपा - Assembly Election 2024
- निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून योजना आणि घोषणांचा पाऊस, केंद्र सरकारच्या योजनेचा महाराष्ट्रातच शुभारंभ का? - Vidhan Sabha Election 2024