अमरावती White Squirrel Spotted In Amravati : सरसर झाडावर चढणारी, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर तुरूतुरू धावणारी खारुताई सर्वांना अगदी शाळेच्या दिवसांपासून परिचयाची. करडा तपकिरी रंग असणारी ही खारुताई आपण अनेकदा पाहिलीय. मात्र, अमरावती शहरात गत दोन महिन्यांपासून गाईच्या गोठ्यामध्ये चक्क पांढरी शुभ्र खारुताई बागडताना दिसतेय. पांढऱ्या रंगाची ही खारुताई लक्षवेधणारी असून या खास खारुताई संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
दोन महिन्यांपासून दिसत आहे पांढरी खारुताई :अमरावती शहरात गजबजलेल्या परिसरात असणाऱ्या अजय यादव यांच्या गाईच्या गोठ्यामध्ये गत दोन महिन्यांपासून पांढरी खार नियमित आढळते. ही लाल रंगाचे डोळे असणारी खारुताई गोठ्यामधील गाईच्या अंगावर चढते, तिच्यासोबत खेळते. गाईला मिळणाऱ्या अन्नातून आपलं अन्नदेखील शोधते. गोठ्यात कुणीही नसलं की सर्वसामान्य खारुताईसोबत ही पांढरी खारुताई इकडून तिकडे उड्या मारत धमाल मजा करते. गायीच्या गोठ्या लगत असणाऱ्या झाडांवर देखील तिचा अनेकदा मुक्काम असतो.
जगात खारुताईंचे 280 प्रकार : अमरावती शहरात पांढऱ्या रंगाची खारुताई ही अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरली असली तरी जगात खारुताईच्या एकूण 280 प्रजाती असल्याची माहिती प्राणी आणि पक्षी मित्र यादव तरटे पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. भारतात खारुताईच्या प्रामुख्यानं 40 प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात मुख्यत्वे खारुताईच्या पाच प्रजाती आहेत. महाराष्ट्रातला राज्य प्राणी शेकरू हा देखील खारीचाच प्रकार आहेत. खारुताई ही लहान किंवा मध्यम आकाराची असते. खारुताईचे मागचे पाय मजबूत असतात आणि पुढच्या दोन्ही पायांना प्रत्येकी चार बोटं तर मागील पायाला प्रत्येकी पाच बोटं असतात. तसंच तिचं शेपूट लांब आणि झुपकेदार असतं. थंडीच्या दिवसात या शेपटामुळं खारुताईला उब मिळते. खारुताईचे समोरचे दात हे देखील लक्षवेधणारेच. खारुताई ज्या भागात राहाते तिथल्या परिस्थितीशी ती जुळवून घेते.