चंद्रपूरBlackbuck In Chandrapur: चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो; मात्र हरणासारख्या दिसणाऱ्या काळवीटाचे येथे वास्तव्य नाही, असाच आजवरचा समज होता. हा समज दहा वर्षांपूर्वी तुटला जेव्हा भद्रावती तालुक्यात काळवीट आढळून आला होता; मात्र हा काळवीट पहिल्यांदाचा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वन्यजीव अभ्यासक सुरेश चोपणे यांनी अतिशय परिश्रमानं काळवीटांना कॅमेऱ्यात कैद केलं आहे. मागील चार वर्षांपासून ते काळवीटांच्या शोधात होते. कोरपना तालुक्यात हे काळवीट असल्याची माहिती त्यांना मिळाली. गेल्या काही दिवसांपासून ते येथे भटकंती करीत होते. अखेर त्यांना यात यश आलं आहे. काळवीटाच्या वास्तव्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जाण्याबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत.
काळवीट जगभरात दुर्मीळ :काळवीट हा प्राणी जगभरात अतिशय दुर्मिळ प्राण्यांच्या श्रेणीत येतो. भारतात हा काही मोजक्या ठिकाणीच आढळून येतो. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी या काळवीटांचे अस्तित्व आहे. पश्चिम महाराष्ट्रात कर्जतच्या परिसरात हे आढळून येतात. त्यांच्या संवर्धनासाठी येथे 3 चौरस किलोमीटरचे रेहतुरी अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील असे हे एकमेव अभयारण्य आहे. दहा वर्षांपूर्वी तो भद्रावती तालुक्यात आढळून आला होता. यानंतर कोरपना येथे आता काळवीटांचा कळप आढळून आला. येथे ह्या प्राण्यांची संख्या 100 ते 150 असण्याची शक्यता आहे.
का आहे काळवीट दुर्मिळ? :काळवीट हा नेहमी खुरट्या जंगलात राहतो. तो अतिशय लाजाळू आणि चपळ प्राणी आहे. नरांना काळी पाठ आणि शिंगे असतात तर मादी भुऱ्या रंगाची असते. ती वर्षातून २ पिले देतात. त्यामुळे मांसभक्षी प्राण्यांकडून शिकार होण्याची सर्वाधिक शक्यता असते. शिवाय शिकारीचा धोका देखील कायम असतो. त्यामुळे दिवसेंदिवस काळवीट हा प्राणी दुर्मिळ होत चाललाय.
संवर्धनासाठी लोकसहभागाची गरज :काळवीटांचे संवर्धन करण्यासाठी त्यांच्यासाठी संरक्षित अभयारण्य असणे आवश्यक आहे. लोकसहभागातून असे संवर्धन करणे शक्य आहे. राज्यातील रेहतुरी अभयारण्यात असाच प्रयोग सुरू आहे. यातून मानव-वन्यजीव संघर्ष कमी होऊन त्यातून वन्यजीवांचे संवर्धन होऊ शकते. कोरपना तालुक्यात जिथे काळवीटाचे वास्तव्य आहे त्या परिसरात देखील अनेकांची शेती आहे. यात कुठलीही आडकाठी न आणता हे शक्य होऊ शकते, असे वन्यजीव अभ्यासक चोपणे यांचे मत आहे.