जालना-माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या, भाजपा नेते दानवेंचा कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच दानवे यांनी लाथ मारलेल्या कार्यकर्त्यानं खुलासा केला आहे.
माजी खासदार रावसाहेब दानवे हे जालना विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांना भेटायला आले होते. त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सदिच्छा भेट घेतली. दोन्ही नेत्यांचं फोटोसेशन सुरू असताना काही कार्यकर्ते फोटो काढण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळी अचानक रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली. हाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रावसाहेब दानवेंवर सोशल मीडियातून टीका सुरू झाली.
तसे काहीच घडले नाही-दानवेंनी लाथ मारलेल्या कार्यकर्त्याचं नाव शेख अहमद आहे. त्यांनी घटनेबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं, "ते दानवेंचे तीस वर्षांपासूनचे मित्र आहे. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंची भेट झाली. सकाळी व्हायरल झालेला व्हिडिओ चुकीचा आहे. चिंधीचा साप करण्यात येत आहे. तसा काहीच विषय नाही. रावसाहेब दानवेंचा शर्ट अडकलेला होता. तेव्हा मी त्यांच्याजवळच उभा होतो. त्यांचा शर्ट काढण्याचा प्रयत्न करत होतो. दानवे साहेबांना काहीच समजले नाही. त्यांच्या हातात पुष्पगुच्छ होता. पण, त्यांनी लाथ मारल्यासारखे काही घडले नाही."
- यापूर्वीही दानवे सापडलेत वादाच्या भोवऱ्यात - "घरी येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणू नका," असे त्यांनी निवडणुकीच्या काळात वक्तव्य केल्यानं रावसाहेब दानवे यांच्याविरोधात 2016 मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. यापूर्वी शेतकऱ्यांना साले म्हटल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. तेव्हा त्यांनी 'साले' हा शब्द मराठवाड्यात शिवी नसल्याची सारवासारव केली होती.
- जालनामधील राजकीय चित्र कसे आहे?जालना हा 1990 पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता. 1990 मध्ये प्रथमच शिवसेनेकडून अर्जुन खोतकर हे या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर झालेल्या सात निवडणुकींपैकी दोन वेळा काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि पाच वेळेला शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले.