महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राम मंदिरासाठी शिवसेनेचा लढा; श्रेय लाटण्याचा भाजपाकडून होतोय प्रयत्न? - शिवसेनेचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न

Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम मंदिर लढ्यात शिवसेनेचं योगदान मोठं होतं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिरासाठी उघड भूमिका घेतली होती. मात्र भाजपा शिवसेनेचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Ram Mandir Ayodhya
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 11:23 AM IST

Updated : Jan 24, 2024, 3:39 PM IST

शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत

मुंबई Ram Mandir Ayodhya : अयोध्यामध्ये राम मंदिर लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला पार पडला. या सोहळ्याकडं देश-विदेशातील नागरिकांचं लक्ष होतं. विविध क्षेत्रातील दिग्गज यावेळी अयोध्येत उपस्थित होते. 1989 पासून राम मंदिराचा लढा सुरू होता. या लढ्यात विविध संघटना आणि राजकीय पक्षांचा सहभाग होता. राम मंदिर लढ्यासाठी शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. मात्र सोमवारी त्यांच्या नावाचा साधा उल्लेखही आढळून आला नाही. त्यामुळं राम मंदिर लढ्यातील शिवसेनेचं श्रेय भाजपाकडून लाटण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप करण्यात येत आहे. त्यावर भाजपाला राम मंदिर लढ्यातील श्रेय शिवसेनेला द्यायचंच नाही, अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हा तर भाजपाचा डाव आहे :जेव्हा देशात बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा भाजपासह सर्वच पक्षातील नेते पुढं येऊन कोणी बाबरीबद्दल बोलत नव्हतं. पण त्यावेळी देशात एकमेव नेता होता, ज्यानं "बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल, तर त्याचा अभिमान आहे" असं उघडपणे सांगितलं होतं. "बाबरीच्या ठिकाणी राम मंदिर व्हावं, हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि याचं श्रेय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला जाते. परंतु हे श्रेय भाजपाला आम्हाला द्यायचं नाही, असं भाजपानं ठरवलं आहे. कारण त्यांना प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्ष संपवायचा आहे, हा त्यांचा डाव आहे. सर्व देशातील लोकांना माहिती आहे की, राम मंदिर व्हावं, तसेच राम मंदिराची घोषणा बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती. त्यावेळी भाजपातील नेते कुठे होते? मात्र आता श्रेय घेण्यासाठी भाजपा पुढं-पुढं करत आहे. यात कित्येक कारसेवक तसेच कार्यकर्ते हुतात्मा झाले. या लढ्यात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. त्या बाळासाहेबांचे साधा नावाचा उल्लेखही केला नाही. यामध्ये भाजपाची संकुचित वृत्ती दिसून येत आहे. मात्र जरी त्यांनी आमचं श्रेय मान्य केलं नाही तरी, जनतेला मात्र सर्व ठाऊक आहे आणि योग्य वेळी याचं जनता उत्तर देईल," असं ठाकरे गटाचे (शिवसेना) प्रवक्ते तुषार रसाळ यांनी म्हटले आहे.

हा भाजपाचा कार्यक्रम नव्हता - शिवसेना (शिंदे गट) :"राम मंदिर लढा आणि राम मंदिराचं श्रेय भाजपा एकाकी घेत आहे आणि शिवसेनेला त्यातून डावललं जात आहे. यात मात्र काही तथ्य नसून असं चित्र निर्माण करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे," अशी टीका (शिवसेना) शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी केली आहे. तसेच "हा फक्त भाजपाचा कार्यक्रम नव्हता तर समस्त भारतवासीयांचा कार्यक्रम होता. देशाचे सर्वोच्चपदी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान या नात्यानं त्यांना पूजेचा मान मिळाला. परंतु हा कार्यक्रम फक्त भाजपानेच आयोजित केला होता, असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण हा कार्यक्रम सर्व रामभक्तांचा, देशातील प्रत्येक व्यक्तीचा कार्यक्रम होता," असं देखील सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच "राम मंदिर लढ्यामधील फक्त भाजपाच श्रेय घेत आहे आणि शिवसेनेला श्रेय दिले जात नाही, असं जे चित्र रंगवलं जात आहे. लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला जात आहे. तो देखील चुकीचा आहे," असं (शिवसेना) शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटले आहे.

याला कारणीभूत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत - भाजपा :"अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं, असा ठराव भाजपानं 1989 मध्ये मांडला होता. तसेच राम मंदिर व्हावं हे भाजपाचं स्वप्न होतं. राम मंदिरासाठी कारसेवक तसेच अनेक कार्यकर्त्यांनी मोठा त्याग केला आहे. राम मंदिर लढ्यामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे प्रेरणास्त्रोत होते. त्यांनी या लढ्यात महत्त्वाची भूमिका घेतली होती. परंतु आता या लढ्याचं श्रेय फक्त भाजपाच घेत आहे आणि शिवसेनेला यातून डावलले जात आहे, असं म्हणणं चुकीचं होईल. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांच्या भूमिकेशी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतारणा केली आहे. त्यामुळे जे वडिलांचं मोठेपण आणि योगदान होतं ते झोकाळण्याचं काम उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलं आहे," असं भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. "पण यातून श्रेयवादाची लढाई असं जे चित्र रंगवले जात आहे ते चुकीचे आहे. राम मंदिर निर्माण होणं किंवा अयोध्येत राम मंदिर होणं हे अधिक महत्त्वाचं आहे," असं देखील कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

जनता योग्य वेळी उत्तर देईल :राम मंदिर लढ्याचं श्रेय भाजपा घेत आहे आणि यातून शिवसेनेला वगळले जात आहे. असा प्रश्न शिवसैनिकांना (ठाकरे गट) विचारला असता, त्यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिर व्हावं, हे स्वप्न होतं हे संपूर्ण देशाला माहिती आहे. यासाठी त्यांनी काय केलं, हे सगळ्यांना माहीत आहे. श्रेयवादापेक्षा राम मंदिर झालं हे खूप महत्त्वाचं आहे आणि या लढ्यासाठी भाजपा श्रेय घेत आहे आणि आम्हाला त्यातून बाजूला केलं जात आहे. हे जरी खरे असेल, तरी याचं जनता योग्य वेळी उत्तर भाजपाला देईल, असं (ठाकरे गटातील) शिवसैनिकांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

रामाचा मुद्दा निवडणुकीत वापरणार म्हणून तुमच्या का पोटात दुखतंय; संजय शिरसाटांचा टोला

'बाळासाहेब ठाकरे अन् आनंद दिघे प्राणप्रतिष्ठा सोहळा बघत असतील'; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Last Updated : Jan 24, 2024, 3:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details