मुंबई Raj Thackeray Warns Theater Owners- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं चित्रपटप्रेम सर्वश्रुत आहे. जेव्हा मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी स्क्रीन मिळत नाही, त्यावेळी राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने घेतलेली भूमिका संपूर्ण महाराष्ट्रानं वेळोवेळी पाहिलेली आहे. राज ठाकरे जितके त्यांच्या राजकारणामुळे चर्चेत असतात, अनेकदा त्याहून जास्त पाकिस्तानी चित्रपट आणि पाकिस्तानी कलाकार याबाबत केलेल्या वक्तव्यावरून चर्चेत येतात. यावेळीदेखील असंच काहीसं झालं आहे.
सध्या पाकिस्तानी चित्रपट 'लिजेंड ऑफ मौला जट' या चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनाबाबत चर्चा सुरू आहेत. पाकिस्तानी अभिनेते फवाद खान याचा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाकिस्तानासोबतच भारतातदेखील प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारलाच इशारा दिला आहे. सोबत राज ठाकरे यांनी मनसेच्या मागील काही आंदोलनाची आठवण चित्रपटगृहाच्या मालकांना करून दिली आहे.
पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे भारतात कशामुळे-राज ठाकरे यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले, "फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?" असा प्रश्न मनसे अध्यक्षांनी उपस्थित केला.
हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर पाकिस्तान तगला-पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी पाकिस्तानमधील चित्रपट प्रदर्शनावर ठाम भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटलं "कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे. पण, पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर पाकिस्तान तगला आहे. अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरू आहे?"