महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ना शिवाजी पार्क, ना आझाद मैदान, दसऱ्याला पॉडकास्टच्या माध्यमातून घुमणार राज ठाकरेंचा 'जय महाराष्ट्र'

दोन वर्षांपूर्वी राज्यात दोन शिवसेना तयार झाल्यात आणि दोन दसरा मेळावेसुद्धा होत आहेत. आता यातील ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Raj Thackeray
राज ठाकरे (ETV Bharat File Photo)

मुंबई :शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. बाळासाहेब असताना शिवसेनेचा दसरा मेळावा दणाणून सोडायचे, त्यांना ऐकायलाही बरेच जण येत असत. परंतु सध्या संपूर्ण राज्यात दसऱ्याच्या दिवशी तीन महत्त्वाचे मेळावे होत आहेत. एक म्हणजे मुंबईतील शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा मेळावा आहे, दुसरा बीडमध्ये गोपीनाथ गडावर होणारा पंकजा मुंडे यांचा मेळावा आहे, तर तिसरा राष्ट्रीय स्वयसेवक संघाचा मेळावा आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी राज्यात दोन शिवसेना तयार झाल्यात आणि दोन दसरा मेळावेसुद्धा होत आहेत. आता यातील ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा हा मुंबईत आझाद मैदानात होणार आहे. मात्र, याच दिवशी आणखी एक ठाकरे जय महाराष्ट्र करणार असून, राज ठाकरेंनी कोणतेही मैदान न निवडता पॉडकास्टचा मार्ग निवडलाय.

दसऱ्याच्या दिवशी राज्यातील जनतेशी संवाद साधणार :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी दसऱ्याच्या दिवशी राज्यातील जनतेशी संवाद साधणार असून, यासाठी त्यांनी पॉडकास्टचा मार्ग निवडलाय. निवडणूक आयोग केव्हाही पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो, असं बोललं जात आहे. मात्र या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आता दसरा मेळाव्याच्या माध्यमातून सर्वच पक्ष निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जात आहे, अशातच पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे नेमके काय मुद्दे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज सर्वच वृत्तपत्रांना जाहिरात देण्यात आली असून, या वृत्तपत्रांमधील जाहिरातीमध्ये 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो' हे राज ठाकरे यांचं प्रसिद्ध वाक्य छापण्यात आलंय. कोणत्याही भाषणाची सुरुवात करताना राज ठाकरे याच वाक्यानं करतात. यापुढे वृत्तपत्रांमधील जाहिरातीत 'चला, पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारू यात' हा राज ठाकरेंचा संकल्पदेखील देण्यात आला आहे. त्याखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रसिद्ध वाक्यदेखील देण्यात आलं असून, 'मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा' ही राज ठाकरे यांची घोषणादेखील वृत्तपत्रांमधील जाहिरातीत देण्यात आलीय.

काहीतरी नव्याने महाराष्ट्राला ऐकायला मिळेल: यासंदर्भात आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, "उद्या सकाळी 9 वाजता राज ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधतील. आता ते उद्या नेमकं काय बोलणार आहेत हे आम्हालादेखील माहिती नाही. राज ठाकरे नेहमी जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा संपूर्ण राज्याला मार्गदर्शन करतात. यावेळी देखील काहीतरी नव्याने महाराष्ट्राला ऐकायला मिळेल," अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिलीय.

हेही वाचाः

ABOUT THE AUTHOR

...view details