महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ते' सोनं लुटत आहेत, तुमच्या हातात आपट्याची पानं, राज ठाकरेंचा पॉडकास्टवरून हल्लाबोल - ASSEMBLY ELECTION 2024

ते सोनं लुटतात अन् जनतेच्या हातात आपट्याची पानं देतात, असा टोलाही त्यांनी लगावलाय. जनतेशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी राजकारण अन् राजकारण्यांवर जोरदार टीका केलीय.

Raj Thackeray
राज ठाकरे (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2024, 4:07 PM IST

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच दसऱ्याच्या निमित्ताने जनतेशी पॉडकास्टवरून संवाद साधलाय. यावेळी त्यांनी आज होणाऱ्या दोन्ही दसरा मेळाव्यांबाबत भाष्य केले असून, या मेळाव्यांमधून केवळ उणी-दुणी काढली जातात, हे सोनं लुटतात आणि जनतेच्या हातात आपट्याची पानं देतात, असा टोलाही त्यांनी लगावलाय. राज्यातील जनतेशी संवाद साधताना यावेळी राज ठाकरे यांनी राजकारण अन् राजकारण्यांवर जोरदार टीका केलीय.

ही वचपा काढायची वेळ :राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा लवकरच होणार असून, आता खरं तर राज्यातल्या जनतेलाही वचपा काढायचाय आणि क्रांती करायची वेळ आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा या सणानिमित्त आपण सर्वांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देत असतो. याच आपट्यांच्या पानांसंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील नेते महाराष्ट्राचे सोनं लुटण्यात मग्न आहेत आणि जनतेच्या हातात आपट्याची पानं देत आहेत. तुम्ही जाती-पातीत मश्गुल आहात, त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी क्रांती केली पाहिजे, असं राज ठाकरे यांनी आवाहन केलंय.

आता बेसावध राहू नका : राज्यातील जनता कधी स्वतःच्या आयुष्यात मग्न आहे, तर कधी जातीपातीमध्ये गुंतून पडली आहे. पण आता या लोकांकडे लक्ष द्यायची वेळ आली आहे, त्यामुळे आजचा दसरा खूप महत्त्वाचा असून, हा निवडणुकीच्या तोंडावर आलेला दसरा आहे. आता कोणीही बेसावध राहून चालणार नाही, असेही राज ठाकरे यांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितलं. महाराष्ट्राचं सोनं अनेक वर्ष लुटलं जातंय आणि आम्ही फक्त एकमेकांना आपट्याची पानं वाटतोय. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही. बाकीचे सगळे सोनं लुटून चाललेत, पण आमचं दुर्लक्ष, असं म्हणत राज ठाकरेंनी जनतेलाही जागरूक होण्याचे आवाहन केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details