अहमदनगर (शिर्डी) Puntamba Railway station: मनमाड दौड रेल्वे मार्गावरील अहमदनगर जिल्ह्यातील 'पुणतांबा' हे रेल्वे स्थानक (Puntamba Railway Station) इंग्रज काळापासून महत्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाते. पुर्वी शिर्डीला येण्यासाठी या स्थानकाचा उपयोग केला जायचा. कालांतरानं पुणतांबा ते शिर्डी असा रेल्वे मार्ग टाकल्यानं हे स्थानक जंक्शन झाले. कोविड काळापूर्वी येथे पँसेजर आणि काही मेल गाड्याही थांबत होत्या. मात्र, कोविड काळात बंद केलेला रेल्वे थांबा कोविड निर्बंध उठल्यानंतरही तसाच सुरु राहिल्यानं पुणतांब्याहुन रेल्वे मार्ग बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचं डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितलं आहे.
'रेल्वे रोको आंदोलन' करणार : पुणतांबा रेल्वे स्थानकावर डेमु आणि एक्सप्रेस गाड्यांचा थांबा पुन्हा सुरु करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी रेल्वे मंत्रालयाकडं मागणी केली. मात्र, त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं. मागण्या मान्य होत नसल्यानं आता पुणतांबेकर आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी या प्रमुख मागणीसह इतर मागण्याच्या पूर्तेतेसाठी येत्या 15 ऑगस्ट रोजी 'रेल्वे रोको आंदोलन' करण्यात येणार असल्याचं निवेदन रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती, डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितली.