मुंबई-लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या ( Rahul Gandhi X post) भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी एक्स मीडियावरून पोस्ट करताना छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्याऐवजी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात उत्साहानं साजरी करण्यात येत आहे. देशभरातील विविध नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. दुसरीकडं राहुल गांधी यांनीदेखील एक्स मीडियावर पोस्ट केली. महापुरुषांना पुण्यतिथीला श्रद्धांजली वाहण्यात येते. तर जयंतीला आदरांजली वाहण्यात येते. पण, राहुल गांधींनी शिवरायांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे एक्स मीडियावरील ही पोस्ट वादग्रस्त ठरली आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते हे एक्स मीडियावरील या पोस्टमुळे टीकेचे धनी झाले आहेत.
राहुल गांधींनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये काय म्हटले? राहुल यांनी त्यांच्या एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो. त्यांना मी विनम्रपणे श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या धैर्यानं आणि शौर्यानं आम्हाला निर्भयतेनं आणि पूर्ण समर्पणानं आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील."