शिर्डी :राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात (Maharashtra Assembly Election 2024) आज (20 नोव्हेंबर) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आपल्या कुटुंबासह लोणी येथील अहिल्याबाई होळकर विद्यालयात मतदानाचा हक्क बजावलाय. विखे पाटील सात वेळा शिर्डी विधानसभेतून विजयी झाले आहेत. यंदा आठव्यांदा ते विधानसभेच्या रिंगणात आहेत. तर आपला विजय निश्चित असून राज्यात महायुतीचं सरकार चांगल्या बहुमतानं येईल, असा विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केलाय.
काय म्हणाले विखे पाटील? :मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारवर जनतेनं विश्वास ठेवलाय. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकारला 165 ते 170 जागा मिळणार आहेत", असा दावा विखे पाटील यांनी केला. तसंच मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं मला 80 हजार मतांनी निवडून दिलं होतं. यावेळी तब्बल 1 लाख मतांनी निवडून येणार, असा विश्वासही यावेळी विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) पुढं ते म्हणाले, "मी कोणत्याही निवडणुकीत प्रचाराची पातळी कधीच सोडली नाही. विरोधकांनी माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. मात्र, याची दखल मी कधीच घेतली नाही. विरोधकांवर टीकाही केली नाही. निवडणूक ही विकास मुद्यांवर लढवली गेली पाहिजे. पण बाळासाहेब थोरात यांनी माझ्याविरोधात अतिशय व्यक्तिगत निवडणूक लढवली."
बाळासाहेब थोरात यांनीही केलं सहकुटुंब मतदान :कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. थोरात हे जरी संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असले तरी त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं मतदान विखे पाटलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात येतं. आज सकाळी बाळासाहेब थोरात, त्यांच्या पत्नी कांचन थोरात आणि कन्या कॉंग्रेस युवा तालुकाध्यक्ष जयश्री थोरात यांनी मतदान केलं. यावेळी महाविकास आघाडीचंच सरकार येणार, असा ठाम विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -
- सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क, काय म्हणाले?
- मतदान प्रक्रियेला सुरुवात, राम नाईक यांनी बजावला पहिला मतदानाचा हक्क; म्हणाले...
- सचिन तेंडुलकरनं पत्नी आणि मुलीसह बजावला मतदानाचा हक्क; मतदानानंतर म्हणाला, 'सर्वांना आवाहन...'